Ravet: बंधारा, नदीकाठावर कपडे, वाहने, जनावरे धुणाऱ्यांवर होणार कायदेशीर कारवाई

Legal action will be taken against those who wash clothes, vehicles and animals on the banks of dams and rivers :बंधारा, नदीकाठावर कपडे, वाहने, जनावरे धुणाऱ्यांवर होणार कायदेशीर कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकरांना पिण्यासाठी पाणी उचलण्यात येत असलेल्या रावेत बंधारा येथे पवना नदीकाठावर अंघोळ करणे, कपडे धुणे, जनावरे, तसेच वाहने धुतली जातात. यामुळे पाणी प्रदुषणात वाढ होत आहे. नदीकाठावर कपडे, वाहने, जनावरे धुणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा पिंपरी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिला आहे.

महापालिका पवना नदीवरील रावेत-पुनावळे येथील बंधा-यातून शुद्धीकरणाकरिता पाणी नेण्यासाठी पंपिंग द्वारे दैनंदिन पाणी उपसा करते. या पाण्यावर से.क्र.23 निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्रामध्ये शुद्धीकरणाची प्रक्रिया करून ते संपूर्ण पिंपरी-चिंचवड पालिका क्षेत्रात पिण्यासाठी व घरगुती वापरासाठी पुरविण्यात येते.

नदी स्वच्छ राखणे, विशेषतः पेयजल स्वच्छ राखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. त्या दृष्टीने महानगरपालिकेने ‘बंधारा व नदीकाठ येथे अंघोळ करणे, जनावरे धुणे, कपडे तसेच वाहने धुणे इत्यादी बाबींना मनाई असल्याबाबतचे फलक रावेत तसेच पुनावळे येथे बंधा-याच्या दोन्ही बाजूस नदी काठावर लावले आहेत.

हे फलक लावूनसुद्धा रावेत-पुनावळे बंधा-यामध्ये नागरिक आंघोळ करतात, जनावरे धुतात, कपडे तसेच वाहने धुतात अशा प्रकारच्या तक्रारी पालिकेकडे येत आहेत. या पार्श्वभूमीवर पाहणी केली असता उपरोक्त प्रमाणे परिस्थिती दिसून येत आहे. यामुळे शहराच्या पेयजलाच्या प्रदुषणात वाढ होत आहे, ही बाब गंभीर आहे.

त्यामुळे “रावेत-पुनावळे येथील बंधारा व नदीकाठ या ठिकाणी अंघोळ करणे, कपडे धुणे, जनावरे तसेच वाहने धुणा-यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे” पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता रामदास तांबे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.