Ravet : हरवलेला तीन वर्षांचा चिमुकला अवघ्या दोन तासात विसावला पालकांच्या कुशीत

एमपीसी न्यूज – तीन वर्षांचा मुलगा रावेत पोलिसांना मंगळवारी (दि. 5) दुपारी सापडला. मुलाचा पत्ता आणि त्याच्या पालकांबाबत काहीही माहिती नसताना पोलिसांनी अवघ्या दीड ते दोन तासात मुलाच्या पालकांचा शोध घेत मुलाला पालकांच्या स्वाधीन केले. वंश विलास चव्हाण (वय 3) असे चिमुकल्याचं नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेत पोलीस चौकीचे पोलीस रावेत परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी रावेत चौकात नॅनो होम्स रेसिडेन्सी जवळ असलेल्या चौकात तीन वर्षांचा चिमुकला रडत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. मुलगा एकटाच रडत उभा असल्याने तो हरवला असल्याचा संशय आल्याने पोलिसांनी त्याच्याकडे जाऊन त्याची चौकशी केली. त्याने केवळ त्याचे नाव सांगितले. त्याचा पत्ता आणि पालकांविषयी त्याला काहीही सांगता येत नसल्याने त्याच्या पालकांचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान होते.

पोलीस कर्मचारी नवीन चव्हाण, गुजर, नंदलाल राऊत, संजय आंधळे आणि रावेत पोलीस चौकीच्या पोलिसांनी परिसरात शोध घेत अवघ्या दीड ते दोन तासात मुलाच्या बहिणीचा शोध लावला. वंश याचे वडील वारल्याने त्याचा सांभाळ त्याची सख्खी बहीण पूजा पवार या करत आहेत. तो घरासमोर खेळता खेळता रस्त्यावर आला आणि काही अंतर चालत गेल्याने घराचा रस्ता विसरला असल्याचे बहिणीने सांगितले. रावेत पोलिसांनी वंशला त्याच्या बहिणीकडे सुखरूपपणे सुपूर्द केले. वंशच्या नातेवाईकांनी पोलिसांचे आभार व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.