Ravet News : अभियंत्यांनी परिसर विकासासाठी योगदान द्यावे – रत्नाकर करंकाळ

एमपीसी न्यूज – शहर विकासामध्ये अभियंत्यांचे निश्चित महत्वाचे योगदान आहे. तसेच अभियंते ज्या परिसरात वास्तव्यास असतात, त्या परिसराचा विकास करण्यासाठीही त्यांनी योगदान द्यावे, असे मत ज्येष्ठ अभियंता रत्नाकर करंकाळ यांनी व्यक्त केले.

सामाजिक कार्यकर्ते दीपक भोंडवे यांच्या पुढाकारातून रावेत येथील समीर लॉन्स येथे नुकताच जागतिक अभियंता दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बांधकाम अभियंता शैलेश मखमाले होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अभियंता रत्नाकर करंकाळ,  ‘डीआरडीओ’चे निवृत्त शास्त्रज्ञ वसंत राऊत उपस्थित होते.

राऊत यांनी भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जीवनातील महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेतला. तसेच ‘डीआरडीओ’चे कामकाज आणि त्यामध्ये अभियंत्यांना असलेल्या संधी याविषयी बहुमोल मार्गदर्शन केले.

मखमाले यांनी अभियंता दिनाचे आयोजन केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अभियंत्यांच्या पाठिशी उभे राहणाऱ्या दीपक भोंडवे यांना अभियंत्यांनी विकासकामांमध्ये सहकार्य करावे, असे आवाहन केले. अभियंते श्रीकांत नवले यांनीही मनोगत व्यक्त केले.

शहर विकासात अभियंत्यांचा सिंहाचा वाटा असतो. त्यांच्या ऋणातून उत्तराई होण्याचा प्रयत्न म्हणून अभियंता दिन साजरा केल्याचे दीपक भोंडवे यांनी सांगितले. दरम्यान, भोंडवे यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

सूत्रसंचालन गणेश वारे यांनी केले. आभार श्रीकांत देशपांडे यांनी मानले. सुनील भोंडवे, अनिरुद्ध खन्नाडे, धनंजय शुक्ला, संतोष भोंडवे, धनंजय सोळुंके,  अशोक करमाळे, वैभव देशमुख,  राजू अहिवळे, विलास सोनवणे, प्रशांत कुंभार, बाळासाहेब दांडे आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.