Ravet News : रावेतमध्ये मोफत लसीकरण मोहिम राबवा : दीपक भोंडवे

एमपीसीन्यूज : पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाच्यावतीने संपूर्ण शहरात कोविड लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. रावेत परिसरातही ही मोहीम राबविण्यात यावी. त्यासाठी मंगल कार्यालयाची जागा उपलब्ध करून देण्यासह आवश्यक सहकार्य करण्याची तयारी रावेत येथील सामाजिक कार्यकर्ते दीपक भोंडवे यांनी केली आहे.

या संदर्भात भोंडवे यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. सध्या संपूर्ण शहरात कोविड लसीकरण सुरु आहे. त्यासाठी ठिकठिकाणी लसीकरण केंद्र सुरु करण्यात आली आहेत. मात्र, रावेत येथील नागरिकांसाठी जवळच्या अंतरावर कोविड लसीकरण केंद्र नाही. गावातच लसीकरण केंद्र सुरु झाल्यास नागरिकांची गैरसोय दूर होण्यास मदत होईल.

सध्या उन्हाळा सुरु आहे. त्यामुळे जेष्ठ नागरिकांना दूर अंतरावरील लसीकरण केंद्रावर जाताना उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच रांगेतही उभे राहावे लागते. लसीकरण केंद्रावर गर्दी असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

जेष्ठांना होणारा त्रास कमी व्हावा यासाठी तसेच रावेतमधील नागरिकांना गावातच लसीकरणाची सोय व्हावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते दीपक भोंडवे यांनी त्यांच्या समीर लॉन्स या मंगल कार्यालयाची जागा उपलब्ध करण्याची तयारी दर्शविली आहे. त्याचबरोबर केंद्रातील डॉक्टर व अन्य कर्मचारी यांच्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, असेही भोंडवे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.