Ravet News: संवेदनशील मनांनी केले रस्त्यावर फिरणाऱ्या ‘ती’चे पुनर्वसन

सख्ख्या भावांनी घेऊन जाण्यास नकार दिल्यानंतर तिच्या आई-वडिलांचा शोध घेऊन त्यांच्याकडे त्या महिलेला सुखरूपणे पोहोचविण्यात आले आहे.

एमपीसी न्यूज – रावेत परिसरात फिरणाऱ्या एका वेडसर महिलेचे परिसरातील संवेदनशील आणि जबाबदार नागरिकांनी रात्रभर झटून पुनर्वसन केले. यात रावेत पोलिसांचीही भूमिका महत्त्वाची आहे. सख्ख्या भावांनी घेऊन जाण्यास नकार दिल्यानंतर तिच्या आई-वडिलांचा शोध घेऊन त्यांच्याकडे त्या महिलेला सुखरूपणे पोहोचविण्यात आले आहे.

प्राजक्ता रुद्रवार यांनी याबाबत माहिती दिली. त्या म्हणाल्या, बुधवारी (दि. 12) एक वेडसर महिला प्राधिकरण सेक्टर 26 मध्ये गेल्या तीन दिवसांपासून रस्त्यावरच राहतेय, असा फेसबुकवर आलेला मेसेज पाहून पिंपरी-चिंचवड महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत व धनंजय शेडबाळे हे काही मदत करता येईल का म्हणून तिथे गेले.

निसर्ग दर्शन सोसायटीच्या बाजूच्या पुलाखाली ही महिला रस्त्यावर विवस्त्र अवस्थेत पडून होती. शेडबाळे यांनी चादर आणून तिच्या अंगावर पांघरली. पण तिचे पूर्नवसन करणे गरजेचे आहे हे लक्षात आले. कारण दुपारी तिथल्या लोकांनी घातलेले कपडे तिने काढून टाकले होते.

रात्री आठ वाजता रुद्रवार यांच्याशी लडकत यांनी संपर्क केला. रुद्रवार यांनी सुरुवातीला आकुर्डी पोलीस चौकीला संपर्क केला. तिथून समजले की हा परिसर देहूरोडच्या हद्दीत आहे. त्यानंतर देहूरोड पोलिसांनी सांगितले की तो भाग रावेत पोलिसांच्या हद्दीत आहे. मग रावेत पोलिसांशी संपर्क करुन रुद्रवार तिथे पोहोचल्या.

दरम्यान, किनारा वृद्धाश्रमच्या प्रीती वैद्य देखील घटनास्थळी पोहोचल्या होत्या. त्यांनी त्या वेडसर महिलेला कपडे घातले. निसर्गदर्शनच्या एका रहिवाशाने तोपर्यंत त्या महिलेचे नाव सोनाली आहे. ती कडुस येथील राहणारी आहे, ही माहिती काढून तिच्या भावांचा संपर्क क्रमांक मिळवला होता. सोनालीच्या भावाशी संपर्क केला आता दोन्ही भावांनी तिला घेऊन जाण्यास नकार दिला.

रावेत चौकीचे पोलीस कॉन्स्टेबल विजयकुमार वाकडे व रमेश ब्राह्मण हे घटनास्थळी पोहोचले. आता पुढे करायचे काय? यासाठी प्रीती वैद्य यांनी येरवड्यात संपर्क करुन अ‍ॅम्ब्युलन्स मागवली. तोपर्यंत मालखरे व निसर्गदर्शन सोसायटीचे लोक जमा झाले.

प्रीती वैद्य, लडकत व रावेत पोलीस सोनालीला घेऊन रात्री 11 वाजता येरवड्याला घेऊन गेले. पण येरवड्यात त्या महिलेस घेण्यास नकार दिला. अगोदर ससूनमधून कोविडची टेस्ट करा, असे सांगण्यात आले.

ससूनमध्ये सोनालीची तात्काळ टेस्ट करण्यात आली. सोनालीचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला. तरीही तिची कुठेही राहण्याची सोय होत नव्हती. म्हणून पहाटे चार वाजता पुन्हा या टिमने तिला रावेत येथे आणले.

आता सोनालीचे पूर्नवसन कुठे व कसे करायचे, हा मोठा प्रश्न सगळ्यांसमोर होता. जास्त चौकशीअंती कळले की भाऊ नाही म्हणाले तरी कडुस येथे तिचे वडील राहतात. मग त्यांच्याशी संपर्क केला तर त्यांनी आणून सोडा असे सांगितले.

सकाळी सहा वाजता रावेत पोलिसांच्या गाडीत प्रीती वैद्य, प्रवीण लडकत, पोलीस कॉन्स्टेबल विजयकुमार वाकडे व रमेश ब्राह्मण हे तिला घेऊन कडुसला निघाले. आठ वाजता या लोकांनी सोनालीला तिच्या आई-वडिलांकडे सुखरूपपणे सुपूर्द केले.

सायंकाळी आठ वाजल्यापासून सोनालीच्या पुर्नवसनासाठी सुरु केलेला प्रयत्न अनेक अडचणींनंतर सफल झाला. बारा तास तिला घेऊन फिरणाऱ्या प्रीती वैद्य, प्रवीण लडकत, रावेत पोलिसांचे पोलीस कॉन्स्टेबल विजयकुमार वाकडे व रमेश ब्राह्मण यांच्या प्रयत्नाला यश आले.

स्वत: न जेवता रात्रभर फिरुन कुठलीही तक्रार न करता तितक्याच आनंदाने प्रवीण लंडकत आणि प्रीती वैद्य यांनी रुद्रवार यांना फोन करून म्हणाले, ‘मॅडम तुम्ही सोनालीला तिच्या घरी सोडण्याचा क्षण मिस केलात…शब्द नाहीयेत बोलायला…’

समाजातील अडचणीत सापडलेल्या लोकांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांच्या आनंदात आनंद मानणारी ही मंडळी खरंच ग्रेट आहे, असेही प्राजक्ता रुद्रवार म्हणतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.