Ravet News : रावेत- किवळे येथील पवना नदीतील जलपर्णी काढा – राजेंद्र तरस

एमपीसीन्यूज : रावेत येथील पंपिंग स्टेशनपासून किवळे आणि मामुर्डीगाव हद्दीत पवना नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी निर्माण झाली. या जलपर्णीमुळे नदी पात्र गायब झाले असून डासांचा उपद्रव वाढला आहे. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन तातडीने पवना नदीपात्र जलपर्णीमुक्त करावे, अशी मागणी शिवसेनेचे युवा नेते राजेंद्र तरस यांनी केली आहे.

या संदर्भात तरस यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन पाठविले आहे. सध्या रावेत ते मामुर्डी या दरम्यान पवना नदी पात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी तयार झाली आहे. त्यामुळे नदीपात्र जलपर्णीमुळे गायब झाले आहे. नदी काठच्या परिसरात विशेषतः रावेत आणि किवळे गावात डासांचे प्रमाण वाढले आहे.

सध्या कोरोना महामारीने नागरिक त्रस्त असताना जलपर्णीची नवे संकट निर्माण झाले आहे. रावेत येथून पवना नदीतून पाणी उपसा करुन पिंपरी चिंचवड शहरात पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, या पात्रातील  जलपर्णीचे साम्राज्य पाहता त्याचा स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने तातडीने जलपर्णी हटविण्यात यावी, अशी मागणी तरस यांनी केली आहे.

येत्या पंधरा दिवसात ही जलपर्णी न हटविल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही तरस यांनी निवेदनात दिला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.