Ravet News : रावेत -किवळे परिसरात शुद्ध पाणीपुरवठा करा, पवनेत रसायनमिश्रित पाणी सोडणाऱ्या कंपन्यांवर कारवाई व्हावी- संगिता भोंडवे

एमपीसीन्यूज : पवना नदी पात्रातील दूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत्युमुखी पडून परिसरातील नागरिकांना दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. रावेत, किवळे आणि परिसरात तातडीने शुद्ध पाणीपुरवठा करावा. त्याचबरोबर नदी पात्रात रसायनमिश्रित पाणी सोडणाऱ्या कंपन्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी भाजपच्या नगरसेविका संगिता भोंडवे यांनी केली आहे.

नगरसेविका भोंडवे यांनी काल ( शुक्रवारी) महापालिका पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता रामदास तांबे यांची भेट घेत रावेत – किवळे येथे दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार केली.

रावेत येथील पवना नदीवरील बंधाऱ्यातून पिंपरी चिंचवड शहरासाठी पाण्याचा उपसा केला जातो. हे पाणी शुद्ध करुन शहरातील नागरिकांना पुरवले जाते. मात्र, या बंधा-यात कंपन्यांचे सांडपाणी आणि रसायनमिश्रित पाणी सोडले जात आहे. परिणामी नदीतील जलचरांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

बुधवारी ( दि. 4) रावेत येथील भोंडवे लॉन्स जवळ पवना नदी पात्रात हजारो मासे मृतावस्थेत आढळले. शिवाय नदीतील पाणीही मोठ्याप्रमाणात दूषित झाल्याचे दिसून आले आहे.

त्यामुळे दोन दिसवसांपासून रावेत, किवळे, विकासनगर परिसरातील नागरिकांना दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा झाला. त्यामुळे नागरिकांनी  संताप व्यक्त केला.

या पार्श्वभूमीवर या प्रभागातील भाजपच्या नगरसेविका संगिता भोंडवे यांनी महापालिका  सह शहर अभियंता रामदास तांबे यांची भेट घेतली. तसेच रावेत, किवळे भागात दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार तांबे यांच्याकडे केली. लवकरात लवकर शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

त्याचबरोबर पवना नदी पात्रात रसायनमिश्रित पाणी सोडणाऱ्या कंपन्यांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणीही भोंडवे यांनी तांबे यांच्याकडे केली.

दरम्यान, या आधी महापौर माई ढोरे यांनी रावेत येथील नदी पात्राची पाहणी करुन नदी पात्रात रसायनमिश्रित पाणी सोडणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.