Ravet News : लिगसी सोसायटीतील वीज समस्यांकडे महावितरणचे दुर्लक्ष

एमपीसी न्यूज – रावेत येथील लिगसी फॉर्च्युन एक्झॉटिका सोसायटीतील वीज समस्यांकडे महावितरण कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप येथील रहिवासी करत आहेत. ऑनलाईन तक्रार देऊन, फोन करून देखील समस्या सोडविण्यासाठी तासंतास प्रतिक्षा करावी लागते असे येथील रहिवासी म्हणतात.

लिगसी सोसायटीचे चेअरमन हिरालाल पाटील म्हणाले, रावेत येथे लिगसी फॉर्च्युन एक्झॉटिका ही 170 कुटुंबांची रहीवासी सोसायटी आहे. सोसायटीसाठी स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर आहे. मात्र, त्या ट्रान्सफॉर्मरला येणारी उच्च दाब वाहिनीची केबल आवटे गॅरेज जवळील सांगाड्यावर जोडली आहे. तसेच येथूनच अनेक इमारती व घरांना कनेक्शन दिले आहेत. केबल जोडण्यासाठी DO फ्युजचा वापर केला आहे.

आठवड्यातून अनेकदा हा DO फ्युज बंद पडतो. त्यामुळे सोसायटी व इतर इमारतीचा वीजपुरवठा खंडित होतो. वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी तासंतास वाट पहावी लागते. बऱ्याच वेळा ऑनलाईन तक्रार देऊन देखील दखल घेतली जात नाही. फोन केल्यास स्थानिक वायरमन फोन उचलत नाहीत किंवा सतत व्यस्त लागतो.

वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी 10 ते 12 तास लागतात. यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. घरातील उपकरणे वापरता येत नाहीत. घरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची गैरसोय होत असल्याचे पाटील यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.