Ravet : पूर्ववैमनस्यातून एकाला मारहाण; सात जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या कारणावरून सात जणांच्या टोळक्याने एकाला लाकडी दांडके व लोखंडी रॉडने मारहाण केली. याप्रकरणी सात जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. ही घटना मंगळवारी (दि. 3) रात्री पावणेदहाच्या सुमारास सोनिगरा आंगण सोसायटी जवळ रावेत येथे घडली.

संदीप सदविर चौधरी (वय 38, रा. ट्रान्सपोर्ट नगर, निगडी), अरुण मदनलाल पवार (वय 24, रा. सिद्धिविनायक नगरी, निगडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यांच्यासह अन्य पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सुभाष रणजितसिंग धायल (वय 36, रा. शिंदे वस्ती, रावेत) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास आरोपी टिगोर कार (एम एच 14 / इ यु 7457), बुलेट (एम एच 14 / जी एम 1000) आणि केटीएम (नंबर माहिती नाही) मोटारसायकल वरून आले. त्यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून सुभाष यांना लाकडी दांडके, लोखंडी रॉडने मारहाण केली.

यामध्ये सुभाष यांच्या हात आणि पायाला गंभीर दुखापत झाली. यानंतर आरोपींनी सुभाष यांना जीवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी चौधरी आणि पवार या दोघांना अटक केली आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.