Ravet : रावेत बंधा-यातील गाळ काढण्यास सुरुवात

पाणी साठवण क्षमतेत वाढ होणार; 25 दिवस गाळ काढणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने रावेत बंधा-यातील गाळ काढण्यास आज (बुधवार) पासून सुरुवात करण्यात आली आहे. पुढील 20 ते 25 दिवस गाळ काढण्यात येणार आहे. त्यानंतर बंधा-याच्या पाणी साठवण क्षमतेत वाढ होईल. अशुद्ध जल उपसा केंद्राकडे येणा-या प्रवाहातील अडथळे दूर होण्यास मोठी मदत होणार आहे. दापोडीतील पाटबंधारे विभागाच्या यांत्रिकी भवनच्या मशिनद्वारे गाळ काढला जात आहे. यासाठी 3 लाख 68 हजार 266 रुपये खर्च येणार आहे.

पवना नदीवरील रावेत येथील बंधारा तत्कालीन लोकसंख्येनुसार पाणी वापर तसेच भविष्यात होणारी लोकसंख्या वाढ लक्षात घेऊन बांधण्यात आला होता. त्यानंतर शहरात निर्माण झालेल्या औद्योगिक क्षेत्रामुळे मागील काही दशकात महापालिका हद्दीत प्रचंड गतीने विकास होत आहे. लोकसंख्या वाढ कमी कालावधीत प्रमाणापेक्षा खूप जास्त असल्याचे दिसून येते. रावेत बंधा-याजवळ महापालिकेचे अशुद्ध जलउपसा केंद्र आहे. सद्यस्थितीत रावेत येथील बंधा-यातून महापालिका 480 एमएलडी, एमआयडीसी 120 एमएलडी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून 30 एमएलडी जलउपसा करते.

रावेत येथील बंधारा पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत आहे. या बंधा-याची देखभाल-दुरूस्तीची कामे पाटबंधारे विभागामार्फत करण्यात येतात. हा बंधारा जुन्या काळी बांधला असल्याने सद्यस्थितीत येथे पाणी साठवणूक क्षमता जलउपसाच्या अनुषंगाने कमी झाली आहे. या बंधा-यातून शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी पाणी उपसा केला जातो. या बंधा-यात एक दिवस पुरेल इतका पाणीसाठा आहे. महापालिकेतर्फे बंधा-यातील साठलेला गाळ काढण्याचे प्रयत्न केले जातात. परंतु, पाण्यातील गाळ काढण्यात मर्यादा येतात. नदीचे पात्र रुंद असल्याने काठावरील व नदीपात्रातील काही अंतरापर्यंत गाळ काढणे शक्य होते. तसेच नदीतील मध्यभागातील गाळ काढता येत नाही.

अशुद्ध जलउपसा केंद्राकडे येणा-या प्रवाहामध्ये काही ठिकाणी उंचवटे आहेत. त्यामुळे पाण्याची पातळी कमी झाल्यास जलउपसा करण्यास अडथळा निर्माण होतो. परिणामी, पाण्याचा विसर्ग ‘डिसचार्ज’ होतो. यापार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे आजपासून धरणातून गाळ काढण्याचे काम हाती घेतले आहे. दापोडीतील पाटबंधारे विभागाच्या यांत्रिकी भवनातील 20 मीटर बुम असलेल्या पोकलेनच्या सहाय्याने गाळ काढण्यात येत आहे. 150 तास गाळ काढण्यात येणार आहे. म्हणजेच पुढील 20 ते 25 दिवस गाळ काढण्याचे काम केले जाणार आहे. यामुळे बंधा-याच्या पाणी साठवण क्षमतेमध्ये काही प्रमाणात वाढ होणार आहे. त्याचबरोबर अशुद्ध जलउपसा केंद्राकडे येणा-या प्रवाहातील अडथळे दूर होण्यास मदत होणार आहे.

याबाबत बोलताना पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामदास तांबे म्हणाले, ”दापोडीतील पाटबंधारे विभागाच्या यांत्रिकी भवनातील 20 मीटर लांब बुम असलेल्या पोकलेनच्या सहाय्याने गाळ काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे. 150 तास गाळ काढण्यात येणार आहे. म्हणजेच पुढील 20 ते 25 दिवस गाढ काढण्याचे काम केले जाणार आहे. रात्री देखील गाळ काढण्यात येणार आहे. यामुळे बंधा-याच्या पाणी साठवण क्षमतेमध्ये काही प्रमाणात वाढ होणार आहे. त्याचबरोबर अशुद्ध जल उपसा केंद्राकडे येणा-या प्रवाहातील अडथळे दूर होण्यास मोठी मदत होणार आहे. यासाठी 3 लाख 68 हजार 266 रुपये खर्च येणार आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.