BNR-HDR-TOP-Mobile

Ravet: बंधा-यातील गाळ काढल्याने पाणी साठवण क्षमतेत 5 ‘दशलक्ष लीटर’ने वाढ

गाळ काढण्याचे काम वेगात सुरु; पंप बंद करण्याचा प्रश्न मिटला

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे रावेत बंधा-यातील गाळ काढण्यात येत आहे. गाळ काढल्याने बंधा-याच्या पाणी साठवण क्षमतेत 5 दशलक्ष लीटरने वाढ झाली आहे. अशुद्ध जल उपसा केंद्राकडे येणा-या प्रवाहातील अडथळे दूर झाले आहेत. परिणामी, पाणी उपसा करणारे पंप बंद करावे लागणार नाहीत. दापोडीतील राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी भवन या शासकीय संस्थेमार्फत गाळ काढला जात आहे.

पवना नदीवरील रावेत येथील बंधारा तत्कालीन लोकसंख्येनुसार पाणी वापर तसेच भविष्यात होणारी लोकसंख्या वाढ लक्षात घेऊन बांधण्यात आला होता. त्यानंतर शहरात निर्माण झालेल्या औद्योगिक क्षेत्रामुळे मागील काही दशकात महापालिका हद्दीत प्रचंड गतीने विकास होत आहे. लोकसंख्या वाढ कमी कालावधीत प्रमाणापेक्षा खूप जास्त असल्याचे दिसून येते. रावेत बंधा-याजवळ महापालिकेचे अशुद्ध जलउपसा केंद्र आहे. सद्यस्थितीत रावेत येथील बंधा-यातून महापालिका 480 एमएलडी, एमआयडीसी 120 एमएलडी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून 30 एमएलडी जलउपसा करते.

रावेत येथील बंधारा पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत आहे. या बंधा-याची देखभाल-दुरूस्तीची कामे पाटबंधारे विभागामार्फत करण्यात येतात. हा बंधारा जुन्या काळी बांधला असल्याने सद्यस्थितीत येथे पाणी साठवणूक क्षमता जलउपसाच्या अनुषंगाने कमी झाली आहे. या बंधा-यातून शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी पाणी उपसा केला जातो. अशुद्ध जलउपसा केंद्राकडे येणा-या प्रवाहामध्ये काही ठिकाणी उंचावटे होते. त्यामुळे पाण्याची पातळी कमी झाल्यास जलउपसा करण्यास अडथळा निर्माण होत होता. परिणामी, पाण्याचा विसर्ग ‘डिसचार्ज’ कमी होत असे. परिणामी, शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत होत होता.

त्यासाठी महापालिकेने दापोडीतील राज्य सरकारच्या जल संपदा विभागाच्या यांत्रिकी भवनातील 20 मीटर बुम असलेले पोकलेनच्या सहाय्याने नदीमधील गाळ, माती काढण्यास सुरुवात केली. पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात गाळ काढण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून बंधा-यातील गाळ काढण्याचे काम सुरु आहे. गाळ काढल्याने बंधा-याच्या पाणी साठवण क्षमतेमध्ये 5 दक्षलक्ष लीटरने वाढ झाली आहे. त्याचबरोबर अशुद्ध जल उपसा केंद्राकडे येणा-या प्रवाहातील अडथळे दुर झाले आहेत. पाणी उपसा करताना येणारे अडथळा दूर झाले आहेत. त्यामुळे आता पंप बंद करण्याची गरज भासणार नाही. याचा फायदा पुणे महापालिकेच्या वाघोलीच्या पाणीपुरवठ्याला देखील होणार आहे.

याबाबत बोलताना पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामदास तांबे म्हणाले, ”दापोडीतील पाठबंधारे विभागाच्या यांत्रिकी भवनातील 20 मीटर लांब बुम असलेल्या पोकलेनच्या सहाय्याने गाळ काढण्यात येत आहे. गाळ काढल्याने बंधा-यातील पाणी साठवण क्षमतेत 5 दशलक्ष लीटरने वाढ झाली आहे. बंधा-यातील पाण्याची पातळी खालावली की बंधा-यातील उंचवट्यामुळे पाणी उपसा करण्यास अडचण येत होती. त्यामुळे पाणी उपसा करणारे पंप बंद करावे लागत होते. गाळ काढल्याने अशुद्ध जल उपसा केंद्राकडे येणा-या प्रवाहातील अडथळे दुर झाले आहेत. यामुळे पंप बंद करावे लागत नाही. शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यास याची मोठी मदत होत आहे. पुढील काही दिवस गाळ काढण्यात येणार आहे”.

HB_POST_END_FTR-A4

.