Ravet : कोयत्याचा धाक दाखवून तरुणाला लुटले

एमपीसी न्यूज – अंधारातून जात असलेल्या तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून लुटले. ही घटना गुरुवारी (दि. 16) रात्री आठच्या सुमारास शिंदेवस्ती रावेत येथे घडली.
विवेककुमार रामप्रवेश मौर्य (वय 21, रा. शिंदे वस्ती, रावेत. मूळ रा. उत्तर प्रदेश) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तीन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवेककुमार गुरुवारी रात्री आठच्या सुमारास शिंदे वस्ती येथील ओवी गॅस एजन्सी येथे जात होते. गॅस एजन्सीकडे जाण्याच्या रस्त्यावर अंधार होता. त्या अंधाराचा फायदा घेत तीन चोरट्यांनी तोंडाला रुमाल बांधून विवेककुमार यांना कोयत्याचा धाक दाखवला. तसेच विवेककुमार यांच्या हातातील बॅग जबरदस्तीने चोरून नेली. त्यामध्ये मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 17 हजार रुपयांचा ऐवज होता. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.