Rawet : संशोधकवृत्तीचे अभियंते देशाचा वेगाने विकास करतील : डॉ. अरविंद शाळीग्राम

एमपीसी न्यूज – देशातील कनिष्ठ, मध्यम तसेच उच्च उत्पन्न गटातील नागरिकांची क्रयशक्ती दिवसेंदिवस वाढणार आहे. जीवन आणखी आरामदायी व्हावे. यासाठी प्रत्येक व्यक्ती मोबाईल, रिमोट, रोबोट वा तत्सम स्वयंचलित यंत्रांचा वापर आपल्या दैनंदिनीत करण्याचे प्रमाण वाढत आहे. इलेक्ट्रीक, स्वयंचलित व सौर उर्जेवरील कार अशा अनेक क्षेत्रात आणखी संशोधन व विकास होणे बाकी आहे. बदलाच्या या टप्प्यावर बहूतांशी यंत्रे स्वयंचलित होणार आहेत. त्याचे संशोधन, उत्पादन विक्री व इतर सेवांसाठी प्रशिक्षित व संशोधक वृत्ती असणा-या अभियंत्यांची गरज भासणार आहे. सर्वच क्षेत्रातील अभियंत्यांचा आगामी काळ उज्वल आहे. संशोधकवृत्तीचे हे अभियंते देशाचा वेगाने विकास करतील, असा आशावाद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. अरविंद शाळीग्राम यांनी व्यक्त केला.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड रिसर्च (पीसीसीओईआर) मध्ये शनिवारी (दि. 22) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संलग्नतेने ‘‘इपीजीपेक्स 2019’’ या पदव्युत्तर प्रकल्प प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. शाळीग्राम यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी ईॲण्डटीसी अभ्यास संचालक मंडळाचे अध्यक्ष डॉ. दत्तात्रय बोरमाने, सदस्य डॉ. अरुण गायकवाड, डॉ. डी. जी. भालके, डॉ. योगेश दंडवते, डॉ. उर्मिला पाटील, पीसीसीओईआरचे प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, पीसीसीओईचे प्राचार्य डॉ. ए. एम. फुलंबरकर, समन्वयक डॉ. राहुल मापारी, प्रा. राहुल परबत, प्रा. रुपाली कावडे आदी उपस्थित होते.

स्वागत प्रास्ताविकात डॉ. हरीश तिवारी यांनी मागील तीन वर्षात महाविद्यालयाने 138 पेटंट, 247 कॉपीराईट्‌सची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झालेली नोंद, 216 हून अधिक शोधनिबंधांचे इंटरनॅशनल जर्नलमध्ये प्रकाशन याची माहिती दिली. या प्रदर्शनात 475हून जास्त विद्यार्थ्यांनी प्रकल्प सादर केले. डॉ. दत्तात्रय बोरमाने, प्राचार्य डॉ.ए.एम. फुलंबरकर, डॉ. अरुण गायकवाड, डॉ. उर्मिला पाटील आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सूत्रसंचालन प्रा. त्रिवेणी ढमाले तर डॉ. राहुल मापारी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.