Pimpri : रायरेश्वर सहकार पॅनलच्या विजयामुळे कामगारांमध्ये प्रस्थापित नेतृत्व बदलाची मागणी असल्याचे अधोरेखित

माजी आमदार नरेंद्र पाटील यांच्या पॅनलचे पानिपत
 
एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यातील माथाडी कामगारांच्या अग्रगण्य अशा रायरेश्वर माथाडी कामगार सहकारी पतसंस्था मर्यादित या पतसंस्थेची रविवारी (दि.12) निवडणूक पार पडली. 25 वर्षांमध्ये पहिल्यांदाच होत असलेल्या या निवडणुकीत मोठे वर्चस्व असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज परिवर्तन पॅनलचा धक्कादायक पराभव झाला असून माथाडी कामगार नेते इरफान सय्यद यांच्या रायेश्वर सहकार पॅनलने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. माथाडी संघटनेचा मोठा वारसा असलेले माजी आमदार नरेंद्र पाटील यांचा प्रतिस्पर्धी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पॅनलचा पराभव झाल्याने सबंध जिल्ह्यातील माथाडी कामगारांमध्ये नेतृत्व परिवर्तनाचे वारे वाहत असल्याचे चित्र आहे. रायरेश्वर माथाडी कामगार सहकारी पतसंस्था जिल्ह्यातील माथाडी कामगारांची नामांकित पतसंस्था असून जिल्ह्याच्या कानाकोप-यातील माथाडी कामगार या संस्थेचे सभासद आहेत.  
कामगार नेते इरफान सय्यद यांचे नेतृत्व असलेल्या रायरेश्वर सहकार पॅनलमध्ये पॅनल प्रमुख ज्ञानोबा मुजुमले, उमेदवार भिवाजी वाटेकर, खंडू गवळी, विजय खंडागळे, ज्ञानेश्वर घनवट, सतीश कंठाळे, ज्ञानेश्वर औतडे, रोहित नवले, सुभाष पूजारी, पाराजी व्यवहारे, प्रकाश चोरे, पुष्पा काळे, ललिता सावंत हे उमेदवार होते. रविवारी चिंचवड येथे ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज परिवर्तन पॅनलचा प्रचार स्वतः माजी आमदार व कामगार नेते नरेंद्र पाटील हे करत होते. तर निवडणूकस्थळीही त्यांनी जातीने हजेरी लावली होती. यामुळे निकालाबाबत माथाडी वर्तुळात कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. दिवसभरात सुमारे 78 टक्के कामगारांनी मतदान केले. दरम्यान सायंकाळी सातच्या सुमारास रायरेश्वर सहकार पॅनलचा ऐतिहासिक विजय घोषित झाला. यावेळी कामगारांनी फटाके फोडून व भंडारा उधळून विजयोत्सव साजरा करत केएसबी चौकातील माथाडी कामगारांचे श्रद्धास्थान असलेले कै. अण्णासाहेब पाटील यांच्या पुतळ्यापर्यंत मिरवणूक काढली. यानंतर इरफान सय्यद व उमेदवार व कार्यकर्त्यांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
 
याबाबत बोलताना महाराष्ट्र मजदूर संघटनेचे सल्लागार बाळासाहेब शिंदे म्हणाले की, काबाडकष्टाने जीवन जगणा-या माथाडी कामगारांकरिता इरफान सय्यद यांच्या नेतृत्वाखाली संघटनेने गेली काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात कार्य केले असून असुरक्षित कामगारांना न्याय हक्क मिळवून दिला. सदर संस्थेच्या माध्यमातून मागील तीन वर्षात पतसंस्थेच्या संचालक मंडळाने सभासदांना साडेचार लाख रुपयांपर्यंत दीर्घ मुदतीचे कर्ज 20 हजार रुपयापर्यंतचे तातडीचे कर्ज देण्याची भूमिका घेतली. सभासदांना एक टक्के व्याजदर कमी केले. सभासदांना लाभांश वाटप, पतसंस्थेचे प्रशस्त कार्यालय सुरु केले.
 
यावेळी कामगारनेते इरफान सय्यद म्हणाले की, महाराष्ट्र मजदूर संघटना अण्णासाहेबांचे विचार समोर ठेऊनच कार्य करेल, असा विश्वास देत पुढे म्हणाले की, सभासदांच्या वाढत्या मागण्यांचा विचार करून कमी व्याज व योग्य वेळी लाभांश तसेच कर्ज देण्याची सुरळीत व्यवस्था करून कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील असणार आहेत, असा विश्वास देऊन समस्त माथाडी कामगारांचे आभार मानले. सर्व उमेदवारांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.