IPL 2021 :शेवटच्या चेंडूवर षटकार मारत आरसीबीने मिळवला दिल्ली कॅपिटल्सवर रोमहर्षक विजय

भरत ठरला विजयाचा शिल्पकार.

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) : प्ले ऑफ मधील प्रवेश आधीच नक्की झाला असल्याने तसा निकालाच्या दृष्टीने फारसा फरक पडणार नव्हता तरीही आजचा दिल्ली बंगलोर मधील हा सामना अत्यंत चुरशीचा झाला, ज्यामध्ये एकवेळ दिल्ली सहज जिंकेल असे वाटत असतानाच श्रीकर भरतने जबरदस्त फलंदाजी करुन आरसीबीला विजयी करण्यात सिंहाचा वाटा उचलला.

साखळी सामन्यातला 56 वा आणि शेवटचा सामना आज दिल्ली आणि आरसीबी यांच्यामध्ये दुबई येथे झाला, ज्यामधे विराट कोहलीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.

दिल्ली कॅपिटल्सच्या पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनी चांगली सुरुवात करून देताना पहिल्या गड्यासाठी 88 धावांची सलामी नोंदवली. चांगली सुरुवात मिळूनही तिचे मोठ्या खेळीत रूपांतर न करू शकता पृथ्वी शॉ 31 चेंडुत 48 वेगवान धावा करून चहलची शिकार ठरला, आणि थोड्याच वेळात धवन सुद्धा 43 धावा काढून हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर बाद झाला.

चांगल्या सुरुवातीनंतरही मधली फळी विशेष कामगिरी न करु शकल्याने दिल्ली कॅपिटल्स मोठी धावसंख्या जरी उभारू शकला नसला तरी हेटमायर, श्रेयस अय्यर आणि यांच्या उपयुक्त फटकेबाजीमूळे 164 धावांचे बऱ्यापैकी मोठे लक्ष उभे करू शकले.

हेटमायरने 22 चेंडूत 29 महत्वपूर्ण धावा काढल्या. आरसीबी कडून मोहम्मद सिराजने दोन बळी मिळवले तर चहल,पटेल यांनी एकेक बळी मिळवून दिल्लीला मोठ्या धावसंख्येकडे जाण्यापासून रोखण्यात मोलाची कामगिरी बजावली.

165 धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजरची सुरुवात फारच खराब झाली. फॉर्मात असणारा पडीकल शून्य तर कर्णधार कोहली चार धावा काढून बाद झाला. या दोन्ही विकेट्स नोर्जेने मिळवल्या.

मात्र या धक्क्याने विचलित न होता श्रीकर भरतने प्रथम एबीडी(26 चेंडुत 26धावा) बरोबर 49 तर ग्लेन मॅक्सवेल सोबत नाबाद 112 धावांची अभेद्य भागीदारी  करून एकवेळ अशक्य वाटत असलेला विजय शक्यप्राय करुन दाखवला,शेवटच्या षटकात 11 धावा हव्या असताना आणि शेवटच्या चेंडुवर पाच धावा हव्या असताना श्रीकर भरतने उत्तुंग षटकार मारत आरसीबीला सात गडी राखून विजयी केले.

भरतने 52 चेंडूत नाबाद 78 धावा काढल्या ज्यामध्ये 3चौकार आणि चार षटकार सामील होते तर ग्लेन मॅक्सवेलने आणखी एक लागोपाठ नाबाद अर्धशतकी खेळीने संघाला पराभवाच्या  खायेतून काढून विजयी केले.मॅक्सवेलने  33 चेंडूत नाबाद 51 धावा काढल्या. येत्या दहा तारखेला दिल्ली आता चेन्नई संघालाबरोबर कॉलीफाय होण्यासाठी लढणार आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.