Blog by Rajan wadke : वाचा ज्येष्ठ पत्रकार राजन वडके यांचा ब्लॉग! सांत्वन… ?

एमपीसी न्यूज – ( राजन वडके ) : घाबरू नकोस, ऊठ, शोध नवीन काही तरी. काळजी घे स्वतःची अन् कुटुंबाची. माझ्यासह अनेक जण स्वतःचे सांत्वन करत, धीर देत दिवस घालवताहेत हे ही दिवस बदलतील या अपेक्षेनं माणुसकीच्या शोधात!…. वाचा ज्येष्ठ पत्रकार राजन वडके यांचा ब्लॉग!  सांत्वन… ?

_MPC_DIR_MPU_II

गेल्या वर्षभरापासून मोबाईलची भीती वाटू लागलीये. रिंग वाजली की छातीत धस्स् होतं. फोन घेत असताना मनांत विचार येतो… आता कोण गेले? कोण `पॉझिटीव्ह` होतं?

एप्रिल महिन्यात एक दिवस `तरुण भारत`मधील माझा सहकारी प्रदीप उपासनीचा फोन आला. राजन वाईट बातमी आहे. आपल्या मनीषाताई लोणकर बाई गेल्या. मी सहजगत्या बापरे…! असा उद्गारलो.

त्याच दिवशी संध्याकाळी विकास वाळुंजकरांचा व्हॉटस् एपवर मेसेज पडला… आपल्या पत्रकारितेच्या अभ्यासक्रमातील मित्र रामदास म्हात्रे यांचे निधन झाले.

रात्री उशीरा सुरेंद्र देशमुखचा फोन येतो… आपला शालेय वर्गमित्र अनंता ढगे गेला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मावसभाऊ रतनचा फोन येतो… अरे राजू, भालचंद्र (माझा मामेभाऊ) गेला.

दोन चार दिवसांत रतनचे पुन्हा फोन येतात… आपली मावसबहीण रेणुका गेली. चंदाचे मिस्टर गेले. अरे, काय चाललयं हे ?  ऑगस्टमध्ये माझा थोरला भाऊ संजय गेला. त्या आधीही काही जण आणि नंतर हे सर्व आणि दरम्यनच्या काळात मित्र, नातेवाईक, स्नेही, परिचित असे किती तरी जण. सोडून गेले, जात आहेत.

कोणाचा फोन घेतल्यावर पलिकडून बोलणारा सांगतो, राजन अरे —- गेले / गेला / गेली. आणि मग माझ्या तोंडातून, अरेरे…, बापरे…, काय म्हणतोस…, फारच वाईट झालं… तुम्ही काळजी घ्या… असं काहीतरी बोललं जातं. पण आता या शब्दांतही कोरडेपणा आलायं, असं मला जाणवतयं.

या परिस्थितीत सांत्वन कोणाचं आणि कसं करायचं. कारण आता `सांत्वन` या शब्दात आणि सांत्वन करण्यासाठीच्या शब्दांतही ओलावा राहिला नाहीये. त्यातच काहीवेळा प्रश्न पडतो, अरे यांचं तर कुटुंबच्या कुटुंब गेलंय. सांत्वन कुणाचं करायचं?

सध्या आपणही सतत दुःखात असतो. प्रत्यक्षात कोणाला भेटताही येत नाही, मग अशा चिंताग्रस्त, तणावग्रस्त वातावरणांत सांत्वन कोणी कुणाचे करायचं? दुःख हलकं कसं करायचं? हा विचार करत असताना जाणवतं, असे दुःखी आपण एकटे नाही. घरोघरी हीच परिस्थिती आहे.

भीती, तणाव, चिंतेच्या सावटाखाली आणि कुटुंबातील माणूस किंवा नातेवाईक गेल्याचे दुःख सहन करत सर्व जण जगताहेत. स्वतःच्या मानसिक समाधानासाठी एकमेकांचे व्हर्च्युअली सांत्वन करण्याचा धीर देण्याचा निष्फळ प्रयत्न करत आहेत. मन घाबरलयं, घरात घुसमटतयं. स्वतःचा, नात्यांचा, मैत्रीचा शोध घेतयं. मन भावनाशून्य झाल्याचा भास होतोय. आता मी सावरलोय की कठोर झालोय माहित नाही.

मोबाईलची रिंग वाजली तरी धस्स होत नाही. कोण गेलं हे ऐकायचं आणि विषय थांबवायचा. कारण पुढे आपण काहीच करू शकत नाही. हे स्पष्ट झालेय. समोरच्याबद्द्ल आपुलकी वाटत असली तरी आपुलकीचे शब्द अर्थहीन आणि कोरडे झालेत. भावनांचा ओलावाही राहिला नसल्याने अश्रूही कधीच आटलेत. मग मीच माझे कोरडेपणाने खोटे सांत्वन करतो.

घाबरू नकोस, ऊठ, शोध नवीन काही तरी. काळजी घे स्वतःची अन् कुटुंबाची. माझ्यासह अनेक जण स्वतःचे सांत्वन करत, धीर देत दिवस घालवताहेत हे ही दिवस बदलतील या अपेक्षेनं माणुसकीच्या शोधात!

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.