Ready Reckoner Rate : पुणे व पिंपरी-चिंचवडमधील फ्लॅट, जागांचे रेडी रेकनर दर वधारले, मुंबईत उतरले

राज्यातील सरासरी सर्वाधिक दरवाढ म्हणजे 3.91 टक्के एवढी दरवाढ पुणे जिल्ह्यात करण्यात आली आहे. पुण्याखालोखाल नंदुरबार जिल्ह्यात 3.01 टक्के आणि रायगड जिल्ह्यात तीन टक्के वाढ झाली आहे.

एमपीसी न्यूज – कोरोनाचे संकट असताना राज्य सरकारने एकीकडे मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्युटी) कमी केले; मात्र दुसरीकडे वार्षिक मूल्यदर तक्ते (रेडी रेकनर) दरात 1.74 टक्के वाढ केली आहे. याचा आर्थिक भूर्दंड नागरिकांना सोसावा लागणार आहे.

राज्यात ‘रेडी रेकनर’च्या दरात सर्वाधिक म्हणजे 3.91 टक्के वाढ पुणे जिल्ह्यात करण्यात आली असून, पुणे महापालिकेच्या क्षेत्रात 1.56 टक्के वाढ झाली आहे. मुंबईतील दर मात्र 0.6 टक्क्याने कमी करण्यात आले आहेत. ही दरवाढ आजपासून लागू होणार आहे.

राज्याचे नोंदणी महानिरीक्षक ओमप्रकाश देशमुख यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अडीच वर्षांपासून रेडी रेकनरच्या दरात वाढ करण्यात आली नव्हती. त्यातच यंदा कोरोनाचे संकट असल्याने यंदाही दरवाढ होणार नाही अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, दरवाढ करून राज्य सरकारने नागरिकांना धक्का दिला आहे. राज्यात सरासरी 1.74 टक्के, ग्रामीण भागात सरासरी 2.81 टक्के, प्रभाव क्षेत्रात 1.89 टक्के वाढ झाली आहे. नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रात 1.29 टक्के वाढ झाली आहे. महानगरपालिका क्षेत्रात 1.02 टक्के वाढ करण्यात आली आहे.

राज्यातील सरासरी सर्वाधिक दरवाढ म्हणजे 3.91 टक्के एवढी दरवाढ पुणे जिल्ह्यात करण्यात आली आहे. पुण्याखालोखाल नंदुरबार जिल्ह्यात 3.01 टक्के आणि रायगड जिल्ह्यात तीन टक्के वाढ झाली आहे. अन्य जिल्ह्यांतील वाढ तीन टक्क्यांपेक्षा कमी आहे.

राज्यांतील महापालिका क्षेत्रांमध्ये सरासरी 1.02 टक्के वाढ झाली आहे. पुणे महापालिकेची मूळ हद्द आणि समाविष्ट 23 गावांतील रेडी रेकनरचे दर वेगवेगळे दर्शवण्यात आले आहेत. त्यानुसार मूळ हद्द म्हणजे मध्यवर्ती पेठा आणि आजूबाजूच्या परिसरासाठी 1.28 टक्के वाढ करण्यात आली आहे. समाविष्ट 23 गावांसाठी 1.88 टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे पुणे महापालिकेच्या क्षेत्रात सरासरी 1.59 वाढ झाली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत 3.41 टक्के वाढ करण्यात आली असल्याने पुणेकर आणि पिंपरी-चिंचवडकरांना सदनिका किंवा जमीन खरेदी करताना आर्थिक फटका बसणार आहे. मुंबई महापालिका वगळता सर्व महापालिकांमध्ये दरवाढ करण्यात आली आहे. मात्र, मुंबईसाठी दर हे 0.6 टक्क्यांनी कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे मुबईकरांना दिलासा मिळाला आहे. ‘मुंबई महापालिका हद्दीत रेडी रेकनरच्या दरापेक्षा कमी दराने व्यवहार झाले आहेत. त्यामुळे मुंबईत दर कमी झाले आहेत,’ असे देशमुख यांनी स्पष्ट केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.