Hinjawadi : पाच चोरीच्या घटनांमध्ये पावणे तीन लाखांचा ऐवज लंपास

0

एमपीसी न्यूज – हिंजवडी आणि पिंपरी परिसरात पाच चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामध्ये दोन दुचाकी, दोन कारच्या काचा फोडून गाडीतून सामान आणि 65 हजारांची केबल चोरून नेली आहे. याबाबत बुधवारी (दि. 12) पिंपरी आणि हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

पहिल्या घटनेत अज्ञात चोरट्यांनी चिंचवड येथील रामकृष्ण सभागृहासमोरून 50 हजार रुपयांची दुचाकी चोरून नेली आहे. रोहित राजेश गिरी (वय 25, रा. काळेवाडी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात फिर्याद दिली आहे. ही घटना 11 फेब्रुवारी रोजी दुपारी चार ते पाच या कालावधीत घडली. गिरी यांनी त्यांची एम एच 14 / जी के 5917 ही दुचाकी रामकृष्ण सभागृहासमोर पार्क केली होती. चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

दुस-या घटनेत अज्ञात चोरट्यांनी बावधन येथील सेहगल मारुती ऑटो सेंटर येथून 25 हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेली आहे. मोहित मिश्रीलाल सोळंकी (वय 23, रा. बावधन) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना एक फेब्रुवारी सकाळी साडेआठ ते दोन फेब्रुवारी सकाळी आठ या कालावधीत घडली. सोळंकी यांनी त्यांची एम एच 12 / एल जी 8928 ही दुचाकी बावधन येथील सेहगल मारुती ऑटो सेंटर येथे पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली.

तिस-या घटनेत अज्ञात चोरट्यांनी हिंजवडी मधील विजय सेल्स समोरून स्कोडा कारच्या काचा फोडून कारमधून लॅपटॉप बॅग, चार्जर, पॉवर बँक, शालेय कागदपत्र व इतर साहित्य चोरून नेले. मनोज माधवराव मारवाळे (वय 40, रा. थेरगाव) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी मरवाळे 11 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पावणेसात वाजता हिंजवडी येथील विजय सेल्समध्ये मोबाईल फोन खरेदी करण्यासाठी गेले होते. त्यांनी त्यांची एम एच 04 / एफ एफ 9710 ही स्कोडा कार सेल्सच्या बाहेर पार्क केली. चोरट्यांनी त्यांच्या कारच्या उजव्या बाजूची मागील काच फोडून कारमधून 40 हजारांचे साहित्य चोरून नेले.

चौथ्या घटनेत चोरट्यांनी कारची काच फोडून एक लाख रुपयांची रोकड चोरून नेली. ही घटना 12 फेब्रुवारी रोजी साक्ली अकरा वाजता कात्रज-देहूरोड बाह्यवळण रस्त्यावर रोहित वडेवाले हॉटेल समोर घडली. राम दशरथ गायकवाड (वय 30, रा. अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी गायकवाड यांनी त्यांची एम एच 12 / आर के 7268 ही कार रोहित वडेवाले हॉटेल समोर पार्क केली. चोरटयांनी कारची काच फोडून कारमधून एक लाख रुपयांची रोकड, ओळखपत्रे व बँकेचे पासबुक घेऊन पोबारा केला आहे.

पाचव्या घटनेत अज्ञात चोरट्यांनी इलेक्ट्रिक खांबावरील एक हजार ५०० मीटर लांबीची केबल चोरून नेली आहे. ही घटना 11 फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावर बावधन येथे सीएनजी पंपाजवळ उघडकीस आली आहे. अभिजित विठ्ठल गायकवाड (वय 29, रा. भूमकरनगर, नेरे आंबेगाव) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. इलेक्ट्रिक खांबावर दिव्यांसाठी लावलेली एक हजार 500 मीटर लांबीची 65 हजार रुपयांची केबल चोरून नेली. वरील चार गुन्ह्यांचा तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like