Pune News : पाणीपुरवठ्याच्या सल्ल्यापोटी 13 कोटी देण्याचा फेरविचार; शिवसेना, काँग्रेसने दिला प्रस्ताव

एमपीसी न्यूज : महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या 11 गावांमध्ये आणि नव्याने समाविष्ट होणार्‍या 23 गावांमध्ये पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी सल्लागारावर 13 कोटी 2 लाख खर्च करण्यास स्थायी समितीने एकमताने मान्यता दिली  आहे. आता या निर्णयाचा फेरविचार करावा, असा प्रस्ताव शिवसेना आणि काँग्रेस पक्षाने दिला आहे.

स्थायी समितीला शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार आणि काँग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी फेरविचाराचा प्रस्ताव दिला आहे. पालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या 11 गावांमध्ये आणि नव्याने महापालिका हद्दीत समाविष्ट होणार्‍या 23 गावांमध्ये पाणीपुरवठा योजना राबविण्याच्या दृष्टीने पालिका प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. या योजनेचा आराखडा, देखरेख, संपूर्ण प्रकल्प व्यवस्थापन आदी कामांसाठी तज्ज्ञ सल्लागार नेमण्यात येणार आहेत.

यासाठी महापालिका प्रशासनाने निविदा मागवल्या होत्या. निविदा प्रक्रियेत 7 ठेकेदारांनी भाग घेतला. त्यापैकी ठेकेदार मे. एल. एन. मालवीय इन्फा प्रोजेक्ट प्रा.लि. यांची निविदा सर्वांत कमी दराने 13 कोटी 2 लाख 64 हजार रुपयांची आली आहे. त्यामुळे हे काम मे. एल. एन. मालवीय यांच्याकडून करून घेण्याचा व त्यांच्याशी करार करण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला. पालिका हद्दीत 23 गांवे घेण्यास निधीच्या कारणावरून विरोध करायचा आणि त्याचवेळी ही गावे पालिका हद्दीत येण्यापूर्वीच बेकायदेशीर निविदा मंजूर करणे चुकीचे आहे.

या कामासाठी पालिकेच्या अंदाजपत्रकात 1 कोटीची तरतूद असताना 13 कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया राबविणे महापालिकेच्या आयुक्तांनी काढलेल्या परिपत्रक आणि धोरणांना हरताळ फासण्यासारखे आहे, असे सुतार आणि बागुल यांनी फेरविचारात नमूद केले आहे. या फेरविचारावर स्थायी समिती काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.