Pune : घरफोडीत सराईत आरोपी ‘माँटी’ पोलिसांच्या ताब्यात

20 घरफोड्या उघडकीस; तब्बल 11 लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत

एमपीसी न्यूज –  चोरीचे सोने विक्री करण्यासाठी आलेल्या सराईत चोरट्यासह आणखी एकाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून रविवारी (दि. 26) पाचच्या सुमारास अटक केली. यावेळी त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्याने पुणे शहरातील विविध भागात 20 घरफोड्या केल्याचे निष्पन्न झाले. त्याने घरात लपवलेले तब्बल 11 लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.  

निखील उर्फ माँटी दत्तात्रय कंगणे (वय-24) आणि अमोल रघुनाथ गोपकर (वय-28), अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखील उर्फ माँटी हा चोरीचे सोने विकण्यासाठी हडपसर गावातील एका सोनाराच्या दुकानात येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी अमोल पिलाने यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने सापळा रचून त्याला जेरबंद केले. त्याची पोलीस कोठडी
घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने शहरातील हडपसर, चंदननगर, येरवडा, विमानतळ, वानवडी, फरासखाना, सहकारनगर, सिंहगडरोड, वारजे माळवाडी आणि निगडी पोलिसांच्या हद्दीत घरफोड्या केल्याचे कबूल केले.

यातील निखील हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर घरफोड्याचे 20 आणि इतर 16 असे तब्बल 36 गुन्हे दाखल आहेत. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.