Lonavala : अट्टल चोरटा गजाआड; 15 घरफोड्या उघड; एकाला अटक

15 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

एमपीसी न्यूज – लोणावळा शहरातील बंद घरे व बंगले यांची टेहाळणी करुन घरफोड्या करणार्‍या अट्टल चोरट्याला लोणावळा शहर पोलीस व पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने संयुक्त कारवाई करत अटक केली. त्याच्याकडून 15 घरफोड्या उघडकीस आल्या असून 15 लाख 40 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला अाहे.  
वसिम रुबाबअली शेख (वय 22, रा. इंदिरानगर, लोणावळा), असे या घरफोड्याचे नाव आहे. त्याला 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक संदीप जाधव यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात पत्रकार परिषद घेत या गुन्ह्याची माहिती दिली. यावेळी लोणावळा उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक ज्ञानेश्वर शिवथरे, लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक भगवानराव पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खुने व तपास पथक उपस्थित होते.
मागील दोन वर्षात लोणावळा शहरात घरफोड्यांच्या प्रमाणात कमालीची वाढ झाली होती. मात्र, आरोपी हाती लागत नसल्याने पोलीस यंत्रणेसमोर मोठे आवाहन निर्माण झाले होते. मागील काही दिवस पोलीस प्रशासनाने रेकाॅर्डवरील गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष केंद्रित केले असता तुंगार्ली येथील र‍ाहत्या घरात येत नसलेला आरोपी वसिम शेख यांचा शोध घेतला असता तो हनुमान टेकडी परिसरात भाड्याने राहत असल्याचे समजले त्याला संशयावरुन ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने लोणावळा परिसरात घरफोड्या केल्याच्या पंधरा घटनांची कबुली दिली. तसेच चोरलेला मुद्देमाल देखील ज्याठिकाणी विकला होता तो हस्तगत करण्यात आला आहे.
वसीम याचे अजून तीन साथीदार फरार आहेत. त्यांचा देखील शोध घ्यायचा असून त्याच्याकडून अजून काही गुन्हे उघड होण्याची शक्यता असल्याचे जाधव यांनी सांगितले. सर्व आरोपी हे लोणावळा परिसरातील असून ज्या चोर्‍या झाल्या आहेत त्या परिसराची त्यांना चांगली माहिती असल्याने परिसरात बंद घरे व बंगले यांचा शोध घेत चोर्‍या करण्याची मोडस त्यांनी वापरली होती. सध्यस्थितीत आरोपीकडून 45 तोळे वजनाचे सोन्या चांदीचे दागिने, 2 लॅपटाॅप, 1 कॅनान कंपनीचा कॅमेरा, 3 एलईडी टिव्ही, 3 मोबाईल असा 15 लाख 40 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.