Chinchwad : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात 720 पोलीस शिपाई पदांची भरती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात पोलीस शिपाई पदावर 720 जागांची भरती करायची आहे. त्याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार संपूर्ण महाराष्ट्रात 3 हजार 450 जागांची भरती करण्यात येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत 23 सप्टेंबर 2019 आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या विविध कक्षांसाठी पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या एकूण 4 हजार 840 पदांची आवश्यकता आहे. त्यापैकी पुणे पोलीस आयुक्तालय आणि पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीणकडून सुमारे 2 हजार 207 पदे पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाकडे वर्ग करण्यात आली आहेत. उर्वरित 2 हजार 633 पदे नव्याने भरती करण्यात येणार आहेत. नव्याने भरती करावयाची पदे तीन टप्प्यात भरली जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात 60 टक्के, त्यानंतर दोन वर्षांनी दुस-या टप्प्यात 20 टक्के आणि त्यानंतर दोन वर्षांनी तिस-या टप्प्यात 20 टक्के पदे भरली जाणार आहेत. त्यातील पहिल्या टप्प्यातील पदांची भरती लवकरच करण्यात येणार आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. महाराष्ट्रातील 23 विभागांमध्ये 3 हजार 450 पदे भरण्यात येणार आहेत. त्यात पुणे शहर पोलीस आयुक्तालयात 214, पुणे ग्रामीण पोलीस दलात 21 आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये 720 पदे भरण्यात येणार आहेत. मुंबई शहर पोलीस दलात 1 हजार 76 सर्वाधिक पदे भरली जाणार असून जालना पोलीस दलात 14 सर्वात कमी पदे भरण्यात येणार आहेत. दुस-या क्रमांकाची पदे पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात भरण्यात येणार आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांचे याकडे लक्ष लागले आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला भरतीसाठी मैदान आणि अन्य सुविधा नसल्यामुळे प्रशासकीय पातळीवर अनेक अडचणींना आयुक्तालयाला सामना करावा लागणार आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात बँड पथकातील पदे रिक्त नाहीत. त्यामुळे या प्रकारातील पदे भरण्यात येणार नाहीत. जिल्हा पोलीस शिपाई, लोहमार्ग पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई या पदांच्या आवेदन अर्जासाठी उमेदवारांची एकच लेखी परीक्षा महापरीक्षा पोर्टलद्वारे ऑनलाईन पद्धतीने प्रथम घेण्यात येईल. त्यानंतर शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. एकाच घटकातील एकाच पदासाठी दोन अर्ज केल्यास त्या उमेदवाराचा अर्ज रद्द केला जाईल, असे अपर पोलीस महासंचालक संजय सक्सेना यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात भरल्या जाणा-या पदांची विभागणी –
# खुला – 180
# ई डब्ल्यू एस – 72

# एस ई बी सी – 94
# ई मा व – 137
# वि मा प्र – 14
# भ ज ड – 14
# भज क – 25
# भज ब – 18
# विजा अ – 22
# अ ज – 50
# अ जा – 94
एकूण – 720

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.