Sangvi Crime News : भरती घोटाळा; बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचा सहसंचालकच निघाला मुख्य सूत्रधार

एमपीसी न्यूज – बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (बीआरओ) मधील भरती घोटाळा प्रकरणात ऑर्गनायझेशनचा सहसंचालक (जॉईंट डायरेक्टर) मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी या भरती घोटाळा प्रकरणाचा तपास करण्यासाठी सहाय्यक आयुक्त पद्माकर घनवट यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (एसआयटी) तयार करण्यात आली होती. या एसआयटीच्या चौकशीत मोठी माहिती उघड झाली आहे.

बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे जॉईंट डायरेक्टर राजेशकुमार दिनेशप्रसाद ठाकूर यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यासह सतीश कुंडलिक डहाणे (वय 40, रा. औंध मिलिटरी कॅम्प, पुणे), श्रीराम बनाजी कदम, अक्षय देवलाल वानखेडे (रा. तेल्हारा, जि. अकोला) यांना अटक करण्यात आली आहे.

गजानन पुरुषोत्तम मिसाळ (वय 23, रा. भातकुली, ता. भातकुली, जि. अमरावती) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (बीआरओ) मध्ये स्टोअर किपर टेक्निकल, मल्टीस्किल वर्कर ड्रायव्हर इंजिन स्टॅटिक या पदांसाठी परीक्षा होती. सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बीआरओ भरती घोटाळा उघडकीस आला. त्यानंतर या गुन्ह्याचा तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली. एसआयटीने या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन तपास केला असून या घोटाळ्यात जॉईंट डायरेक्टरच मुख्य सूत्रधार असल्याचे एसआयटीच्या तपासात निष्पन्न झाले.

या परीक्षेचे मार्च महिन्यात पेपर सेट केले. यात ठाकूरची महत्वाची भूमिका होती. ही परीक्षा ऑक्टोबर 2021 मध्ये झाली. ठाकूर याने 60 जणांना प्रश्नपत्रिका पुरविण्यासाठी इतर आरोपींच्या सहकार्याने 25 लाख रुपये घेतले. विमानतळ येथे नऊ लाख आणि मुलाच्या बँक खात्यावर पाच लाख रुपये घेतले. ठाकूरला आणखी काही रक्कम मिळणार होती. ठाकूर 2005 ते 2008 मध्ये दिघी येथे कार्यरत असताना अन्य आरोपींसोबत त्याचा संपर्क आला. त्याचा मुलगा हावर्ड मध्ये पीएचडी करत आहे. त्याच्या खात्यावर पैसे पाठवण्यात आले आहेत. या सर्व प्रकरणाचा तपास सुरू आहे.

काय आहे फसवणूक प्रकरण –

फिर्यादी हे अमरावती येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अमरावती विभागात मोटार मेकॅनिक पदावर ॲपरेंटीसशीप करत आहेत. फिर्यादी व त्यांचे मित्र धनंजय वट्टमवार यांना आरोपी अक्षय वानखेडे याने बॉर्डर रोडस ऑर्गनायझेशन (जीआरईएफ) या आर्मीच्या भरतीमध्ये व्हेईकल मॅकॅनिक या पदासाठी नोकरीस लावतो असे आमिष दाखवले. हे काम आरोपी सतीश डहाणे याच्या सांगण्यावरून करत असल्याचे अक्षय याने सांगितले.

त्यानुसार फिर्यादी व त्यांच्या मित्राकडून भरतीसाठी 70 हजार रुपये घेतले. 4 जानेवारी 2022 रोजी दुपारी तीन वाजता फिर्यादी, फिर्यादीचे मित्र धंनजय वट्टमवार (वय 21), निलेश ईश्वर निकम (वय 23, रा. मु पो आगार खुर्द, ता. मालेगाव, जि. नाशिक), अक्षय बाळु सांळुखे (वय 25, रा. खेडगाव, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) हे रक्षक चौक औध मिलिटरी कॅम्पच्या समोर भरतीसाठी आले.

दरम्यान, या प्रकरणाची मिलिटरी इंटेलिजन्सला कुणकुण लागली. मिलिटरी इंटेलिजन्सने फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांना ताब्यात घेतले. त्यांना सांगवी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून आर्मी भरतीसाठी लागणारी कागदपत्रे, रोख रककम, कॉम्प्युटर, पेन ड्राइव्ह, दोन दुस-याच्या नावे असलेले रबरी शिक्के, मिलिटरीचे स्वतःचे बनावट ओळखपत्र, वेगवेगळी बनावट एनव्हलप, कमांडट ग्रेफ सेंटर यांचे ॲकनॉलेज कार्ड, बी आर ओ चे भरतीचे अॅडव्हटाईज नंबर 2/2021 चे उमेदवारांचे भरलेले फॉर्म, इत्यादी कागदपपत्रे, तसेच उमेदवांराशी शैक्षणिक पात्रतेची झेरॉक्स प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅनकार्ड व आटीलरी नाशिक रोड कॅम्प यांचे ॲप्लिकेशन फॉर्म इत्यादी ताब्यात घेण्यात आले आहेत.

एसआयटीकडून प्रकरणाचा तपास सुरू –

या घोटाळ्याच्या तपासासाठी पोलीस आयुक्तांनी एसआयटीची स्थापना केली. त्यामध्ये सहायक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे, पोलीस निरीक्षक अजय जोगदंड, पोलीस निरीक्षक डाॅ. संजय तुंगार, सहायक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख, उपनिरीक्षक मिनीनाथ वरुडे यांचा या एसआयटी मध्ये समावेश आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.