Pune : सनसिटी रस्त्यावरील वाहतूक कोंडी होणार कमी; नगरसेविका मंजुषा नागपुरे यांची माहिती

एमपीसी न्यूज – शिवपुष्प पार्क ते क्राऊन बेकरी रस्ता महानगरपालिकेच्या ताब्यात येऊन लवकरच रुंदीकरण होणार आहे, अशी माहिती नगरसेविका मंजुषा दीपक नागपुरे यांनी शुक्रवारी पत्रकारांना दिली.

अरुंद रस्त्यामुळे शिवपुष्प पार्क ते क्राऊन बेकरी दरम्यान वाहतूक कोंडीला सनसिटी परिसरातील नागरिकांना सामोरे जावे लागत होते. ही बाब लक्षात घेऊन, मंजुषा दीपक नागपुरे यांनी महानगरपालिका व स्थानिक जागा मालक यांच्याशी सातत्याने पाठपुरावा करून सदर रस्त्याच्या रुंदीकरणासाठी प्रयत्न केले.

आज अखेर स्थानिक जागा मालक माजी नगरसेवक शैलेश बाळासाहेब चरवड व हर्षल शिवाजी चरवड यांना बरोबर घेऊन पुणे मनपाचे सिटी इंजिनियर यांची भेट घेतली. त्यांना समस्येचे गांभीर्य लक्षात आणून दिले. लवकरात लवकर समस्या सुटावी, यासाठी कार्यवाही करण्याची विनंती केली. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर इमारतीचे त्वरित पार्ट कम्पलिशन सर्टिफिकेट देण्याचे आदेश सिटी इंजिनिअर प्रशांत वाघमारे यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिले.

सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवणे ही आमची प्राथमिकता असून, त्यासाठी अनेक पावले उचलत आहोत. पर्यायी रस्त्यांची कामे यांबरोबरच स्थानिक ठिकाणची वाहतूक कोंडी सोडवण्यावर देखील भर देत आहोत. या कामात आणखी एक यश मिळाले. या परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी जागामालक शैलेश बाळासाहेब चरवड व हर्षल शिवाजी चरवड व चरवड परिवार यांचे विशेष सहकार्य लाभले. या रस्त्यासाठी २८ गुंठे जागा चरवड परिवाराने दिली.

सनसिटी रस्त्यावरील लोकांसाठी ही आनंददायक बाब असून, लवकरच ही जागा हस्तांतरीत होऊन येथे रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करू, या कामासाठी चालू आर्थिक वर्षात माझ्या विकास निधीतून २० लाख एवढी तरतूद केली आहे, अशी माहिती मंजुषा नागपुरे यांनी दिली. एका बाजूने कॅनल व दुसऱ्या बाजूने नदी असलेला हा परिसर असल्याने नवीन रस्ता करण्याच्या मर्यादा आहेत. त्यामुळे वाहतुकीचा प्रचंड ताण सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्यांवर येतो.

डीपीमध्ये असलेल्या या भागातील सर्व रस्ते, महानगरपालिकेने त्वरित लक्ष घालून सुधारले पाहिजेत. यासाठी जागा ताब्यात घेणे व ते रस्ते विकसित करणे या गोष्टीं पालिका प्रशासनाने युध्द पातळीवर करण्याची आवश्यकता आहे. मी या महत्वाच्या विषयाचा सतत पाठपुरावा करत आले आहे. आणि याचाच भाग म्हणून आज हा शिवपुष्प पार्क ते क्राऊन बेकरीचा रस्त्याच्या कामास गती मिळाली आहे, असेही मंजुषा नागपुरे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.