Chakan MIDC Road Condition: रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत उद्योजकांच्या संघटना आक्रमक मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना निवेदने

एमपीसी न्यूज : चाकण औद्योगिक भागातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांची दैना झाली आहे. चाकण एमआयडीसी मधील कारखानदार आणि वाहतूकदार यामुळे त्रस्त झाले असून याचा औद्योगिक एकूणच स्थितीवर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे तातडीने या भागातील महामार्गांची कामे मार्गी लावण्याची मागणी उद्योजकांच्या संघटनेने राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि या रस्त्यांशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदने देण्यात आली आहेत.

देशातील वाहन उद्योगाचे अव्वल केंद्र बनण्याची क्षमता चाकणमध्ये असल्याची बाब येथे मर्सिडीज बेंज, ह्युंडाई, फोक्सवॅगन अशा अनेक बड्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या (Multinationanal Company) मागील 15 ते 20 वर्षांत झालेल्या गुंतवणुकीने स्पष्ट झाली आहे. थेट अमेरिकेशी स्पर्धा करणाऱ्या महाराष्ट्राचे “डेट्रॉईट’ म्हणून उभे राहू पाहणाऱ्या चाकण एमआयडीसीतील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या भागातील खराब व अरुंद रस्त्यांनी वाहतूक कोंडीची आणि सततच्या अपघातांची शृंखला सुरूच आहे. पुणे-नाशिक महामार्ग, चाकण -तळेगाव, चाकण-शिक्रापूर मार्गाची दुरवस्था झाली आहे. या मार्गांची कामे त्वरित करावी, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच संबंधित विभागाचे अधिकारी, जिल्हाधिकारी यांना फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजच्या वतीने निवेदन देण्यात आले असल्याचे संघटनेचे सचिव दिलीप बटवाल यांनी संगीतले.

समस्यांची शृंखला
चाकण पंचक्रोशीचा व्याप आता नियंत्रणाबाहेर जाऊ लागला आहे. वाढती वाहतूक कोंडी, घन कचरा, सांडपाणी, सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य, गुन्हेगारी आदी समस्या मोठया प्रमाणात भेडसावु लागल्या आहेत. या सर्व समस्या चाकण औद्योगिक परिसरात मध्ये दिवसेंदिवस उग्र रुप धारण करीत आहेत. राजकीय इच्छाशक्ती व प्रशासकीय ताकद एकवटली जात नसल्याने त्यांचे निराकरण निर्मूलन करणे दुरापास्त झाल्याची सर्वसामान्यांची भावना आहे. उद्योजकांच्या संघटना आता या बाबी शासनाच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.