Pimpri News : ललित कला अकादमीचे प्रादेशिक केंद्र पिंपरी चिंचवडमध्ये 

 एमपीसी न्यूज – ललित कलांचे संगोपन, प्रसार आणि संशोधन करणा-या केंद्र सरकारच्या  ललित कला अकादमीचे प्रादेशिक केंद्र पिंपरी चिंचवडमध्ये स्थापन केले जाणार आहे. केंद्र सरकारने यासाठी मान्यता दिली असून, राज्य सरकार आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या करारानंतर हे केंद्र सुरू होणार आहे. 

ललित कला केंद्र महाराष्ट्रात होण्यासाठी अनेक कलाकार प्रयत्नशील होते त्यासाठी आता पिंपरी चिंचवड येथील जागा निश्चित करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड मधील विकास केंद्राची 15 एकर जागा यासाठी निवडण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य सरकार मिळून सुपारे 15 कोटी रूपये खर्च करणार असल्याची माहिती आहे.

या केद्रामुळे प्रदर्शनांसाठी कलादालन उपलब्ध होणार आहे. तसेच, संशोधनासाठी स्टुडिओ, लेझरसह नवतंत्रज्ञानावर आधारित कलांसाठी दालन, कलेचे शिक्षण घेणा-यांसाठी शिष्यवृत्ती आणि कार्यशाळांचे आयोजन, जेष्ठ कलाकारांच्या कलाकृतींचे संग्रहालय, कलाकारांसाठी निवासव्यवस्था आणि महाराष्ट्रातील कलांचा इतिहास सांगणारे प्रदर्शन व्यवस्था यामुळे उपलब्ध होणार आहे. या केंद्रामुळे कलांचा विकास होण्याबरोबरच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संधी मिऴतील अशी भावना कलाकारांनी व्यक्त केली आहे.

पिंपरी चिंचवड शहर हे खऱ्या अर्थाने जगाच्या नकाशावर आलं आहे. आजवर कलाकारांनी केलेल्या साधनेला यश आलं असं म्हणता येईल. आजपर्यंत कला आणि सांस्कृतिक विषयक गोष्टी या दिल्ली भोवती फिरत राहायच्या. या केंद्रामुळे कला अधोरेखित होईल व त्याचा विस्तार होईल. महाराष्ट्रातील कलाकारांना याचा फायदा होईल अशी प्रतिक्रिया अखिल भारतीय नाट्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी ‘एमपीसी न्युज’ला दिली.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.