Pimpri: जाचक अटींमुळे अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाकडे नागरिकांची पाठ

नियमितीकरणासाठी केवळ सहा अर्ज दाखल

एमपीसी न्यूज – शासनाच्या जाचक अटी, कागदपत्रांचे जंजाळ, त्यामधील त्रुटी अशा अनेक कारणांमुळे बांधकामे नियमित करण्यासाठीच्या योजनेला नागरिकांचा अतिशय थंडा प्रतिसाद मिळत आहे. दहा महिन्यापुर्वी शासनाने पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या जमिनीवर अतिक्रमण करून बांधण्यात आलेली निवासी बांधकामे नियमित करण्याची योजना आणली. यासाठी प्राधिकरण प्रशासनाकडे आतापर्यंत केवळ सहाच अर्ज प्राप्त झाले आहेत. प्रत्यक्षात 2 हजार 650 इतक्या अर्जांची विक्री झाली आहे.

भोसरी, मोशी, चिखली, निगडी, आकुर्डी, वाल्हेकरवाडी, रावेत, थेरगाव, वाकड आदी गावांच्या जमिनी संपादित करून नवनगर विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. त्यानुसार, भूखंडांची आखणी केली. काहींनी पक्की घरे बांधली. वाल्हेकरवाडी, थेरगाव, काळेवाडी ङ्गाटा या भागात प्राधिकरण स्थापनेपूर्वीच घरे होती. काहींनी स्थापनेनंतर आपापल्या सोयीनुसार बांधकामे केली. त्यात अतिक्रमणे करून झालेल्या बांधकामांचा आणि मंजूर क्षेत्रापेक्षा अधिक बांधकामांचा समावेश आहे. अशी अतिक्रमित परंतु, निवासासाठीची बांधकामे सर्वांसाठी घरे या सरकारच्या उद्दिष्टांनुसार नियमित केली जाणार असून त्यासंदर्भात राज्य सरकारने 8 मार्च 2019 रोजी अध्यादेश काढला आहे.

अनुसूचित जाती व जमाती, इतर मागासवर्ग, आर्थिक दुर्बल घटकांतील नागरिकांनी प्राधिकरणाच्या जागेवर अतिक्रमण केले असल्यास ते दंड न आकारता संबंधित नागरिकाच्या नावे केले जाणार आहे. 500 चौरस फुटापर्यंतची जागा संबंधितांच्या नावावर मोफत केली जाणार आहे. 500 ते 1 हजार चौरस फुटांपर्यंतची अतिक्रमणाची जागा रेडीरेकनरच्या 10 टक्के, 1 हजार ते 1500 चौरस फुटांपर्यंतची अतिक्रमणाची जागा रेडीरेकनरच्या 25 टक्के दंड आकारून संबंधितांच्या मालकीची करण्याचे नियोजन आहे मात्र अत्यंत किचकट अटींमुळे हे नियोजन फसले आहे.

या आहेत नियमितीकरणासाठी अटी!

#जानेवारी 2011 किंवा त्यापूर्वी केलेले निवासी बांधकाम
#कमाल 1500 चौरस फुटांपर्यंतचे बांधकाम
#अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तीस मोफत
#1500 चौरस फुटांपेक्षा जास्त बांधकाम 1500 चौरस फुटांपर्यंत कमी केल्याशिवाय नियमित होणार नाही
#ना विकास क्षेत्रातील अर्थात डोंगर उतार, सीआरझेड असे अतिक्रमण नियमित केले जाणार नाही
#बांधकाम नियमित करताना पती व पत्नी अशी दोघांची नावे समाविष्ट केली जातील

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.