Mumbai: ‘रिलायन्स’ने उचलली 50 लाख लोकांच्या भोजनाच्या खर्चाची जबाबदारी

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या महासंकटाशी देश मुकाबला करीत असताना देशातील अनेक उद्योगपतींनी भरघोस मदतीचा हात पुढे करीत राष्ट्रीय कर्तव्याचे पालन केले आहे. देशातील उद्योगक्षेत्रातील आघाडीच्या उद्योगांपैकी रिलायन्स इंडस्ट्रीजने 50 लाख देशबांधवांच्या पुढील दहा दिवसांच्या भोजनाच्या खर्चाची जबाबदारी उचलली आहे. त्यासाठी कंपनी पंतप्रधान निधीला 500 कोटी रुपयांची मदत करणार आहे. 

यापूर्वी टाटा उद्योगसमूहाने कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी एकूण 1500 कोटी रुपये, बजाज ऑटोने 500 कोटी रुपये पंतप्रधान निधीसाठी देऊ केले आहेत. देश मोठ्या संकटाशी सामना करीत असताना मोठ्या प्रमाणात पैशांची गरज लागणार आहे. या पार्श्वभूमीवर रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांमी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

पुढील 10 दिवस 50 लाख गरजू देशबांधवांना मोफत भोजन प्रायोजित करण्यासाठी पीएम केअर्स फंडाला 500 कोटी रुपयांचे योगदान देण्यात येणार आहे, असे मुकेश अंबानी यांनी जाहीर केले.

हिरो कंपनीनेही 100 कोटींचा निधी जाहीर केला आहे. त्यापैकी 50 कोटी पीएम केयर्स निधीला देण्यात येणार असून उर्वरित निधी कंपनी स्वतःही मदतकार्यासाठी वापरणार आहे. योगगुरू रामदेव बाबा यांनी ‘पतंजली’तर्फे 25 कोटी रुपयांची देणगी जाहीर केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.