Pune : पूरग्रस्त कुटुंबीयांना स्वयंसेवी संस्थांकडून जीवनावश्यक वस्तूंची मदत

एमपीसी न्यूज – शहरातील पूरग्रस्त कुटुंबीयांना पालिकेच्या विविध शाळांमधून स्थलांतरित करण्यात आलेले आहे. पालिकेच्या शाळांतून पूरग्रस्तांचे स्थलांतर केल्यानंतर तेथील मुलभूत सुविधा संबंधित क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर उपलब्ध करून देण्यात येत आहे. या पूरग्रस्तांना चहा, नाष्टा, दोन वेळचे जेवण, वैद्यकीय सुविधा अशा प्रकारच्या सुविधा स्थानिक पालिका सभासद, कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था देत आहेत.

या पार्श्वभूमीवर पूरग्रस्तांचे मदतीकरिता भाजी-पोळी व वापरा योग्य सुस्थितीमधील जुने कपडे देण्यात यावेत. अशी संकल्पना पालिका कर्मचाऱ्याकडून राबवण्यात येत आहे. या अंतर्गत सेवकांनी बिस्कीट पुडे, भाजी पोळी, बेकरी पदार्थ, स्वतःच्या जेवणाचे डबे देण्यास सुरुवात केली आहे. शिवाजीनगर गावठाण येथील पालिका शाळा व लालबहाद्दूर शास्त्री पालिका शाळेत कामगार पुतळा वसाहत, राजीव गांधी नगर येथील पूरग्रस्त तसेच शिवाजीनगर पोलीस लाईन पुणे ५ येथील वीर नेताजी पालकर शाळा क्र.२ व शिरीष कुमार शाळा येथील सुमारे ५०० पूरग्रस्तांना भाजी पोळी, अन्य खाद्यपदार्थ व कपडे देण्यास सुरुवात करण्यात आली व या अभिनव उपक्रमास मनपा सेवकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद वाढू लागला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.