Pimpri : व्यक्तीपेक्षा धर्म कर्तव्य नेहमी श्रेष्ठ असते – प. पू. प्रतिभाकुंवरजी महाराज 

एमपीसी न्यूज – स्वता:च्या आत्म्याशी संवाद साधण्याचा मार्ग म्हणजे उपवास. उपवास आणि दानधर्माचा उपयोग पाप धुण्यासाठी नव्हे, तर पापापासून दूर राहण्यासाठी करावा. सामाजिक कर्तव्य म्हणून दिले जाते ते दानधर्म, सेवेच्या बदल्यात दिली जाते ती दक्षिणा. प्रत्येक वस्तूचे, सेवेचे आणि दानधर्म व दक्षिणेचे मुल्य वेगळे असते. व्यवहाराशिवाय व सेवेशिवाय दक्षिणा घेणे चूक आहे. व्यक्तीपेक्षा धर्म कर्तव्य नेहमी श्रेष्ठ असते, असे प. पू. प्रतिभाकुंवरजी महाराज म्हणाले.

निगडी प्राधिकरणातील वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने पाटीदार भवन येथे पर्युषण पर्वनिमित्त प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब यांचे प्रवचन आयोजित केले होते. यावेळी प.पू. प्रफुल्लाजी म.सा., प.पू. हंसाजी म.सा., प.पू. पुनितीजी म.सा., प.पू.गरिमाजी म.सा., प.पू.महिमाजी म.सा. आदी ठाणा 6 तसेच संघाचे अध्यक्ष नितीन बेदमुथा, संतोष कर्नावट, मनोज सोळंकी आदी उपस्थित होते.

प. पू. प्रतिभाकुंवरजी महाराज म्हणाल्या, जीवनातील चढ उतारातही चित्त स्थितप्रज्ञ ठेवायचे असेल तर साधना आवश्यक आहे. व्यवहार, वाणी, विचार, उच्च ठेवले तर समोरच्या व्यक्तींच्या ह्रदयात, मनात स्थान मिळते. तर दुराचाराने, कटूवाणीने, गैरवर्तणूकीने समोरच्या व्यक्तींच्या मनातून ती व्यक्ती उतरते. प्रतिकुल परिस्थितीतही मन, वाणी व  व्यवहारावर नियंत्रण मिळविण्याची शक्ती उपवासाने, साधनेने मिळते. जीवनात यशस्वी होण्यासाठी सर्वानी भगवान महावीर यांनी सांगितल्याप्रमाणे तप, ध्यान, धारणा, उपवास, साधना करावी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.