Pune : महाशक्तीशाली संभाजी कावजी कोंढाळकर रथातून नौदलाचे स्मरण

शिवजयंतीनिमित्त लालमहाल येथून मिरवणुकीत फुलांच्या जहाजाने सजलेला रथ सहभागी ; सरदार कोंढाळकर घराण्यातील वंशजांची उपस्थिती

एमपीसी न्यूज – महाशक्तीशाली रणमर्द सरदार संभाजी कावजी कोंढाळकर… एका घावात वाघाला ठार करणा-या संभाजी कावजी कोंढाळकर यांच्या अंगी प्रचंड ताकद असल्याचे छत्रपती शिवाजी महाराज जाणून होते. त्यामुळेच अफजलखान भेटीप्रसंगी महाराजांनी दहा अंगरक्षकांमधे संभाजी कावजी कोंढाळकर यांची निवड केली आणि कोंढाळकरांनी अफजलखानाची पालखी उचलणा-या सर्व भोयांचे पाय कलम केले आणि अफजलखानाचे शिर कापून, ते कापलेले शिर घेऊन महाराजांकडे गेले. त्यांच्या कार्याला पुण्यात अभिवादन करण्यात आले. शिवजयंतीच्या निमित्ताने फुलांच्या जहाजाने सजलेला रथ साकारुन त्यांना मानवंदना देत भारतीय नौदलाचे स्मरण करण्यात आले.

लाल महाल येथून शिवजयंती महोत्सव समितीतर्फे आयोजित शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्यात महाशक्तीशाली रणमर्द सरदार संभाजी कावजी कोंढाळकर रथ देखील सहभागी झाला होता. सरदार संभाजी कावजी कोंढाळकर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणतात्या कोंढाळकर, उपाध्यक्ष राहुल कोंढाळकर, सचिव ओंकार कोंढाळकर, खजिनदार नितीन कोंढाळकर, सचिन कोंढाळकर, आनंदमहाराज कोंढाळकर, बाळकृष्ण कोंढाळकर, धोंडीराम कोंढाळकर, ज्ञानदेव कोंढाळकर,  निलेश कोंढाळकर, दत्ता कोंढाळकर, योगेश कोंढाळकर, प्रवीण कोंढाळकर, विशाल कोंढाळकर, पोपट कोंढाळकर, चंद्रकांत कोंढाळकर, उमेश कोंढाळकर, गणेश कोंढाळकर, रमेश कोंढाळकर, प्रकाश कोंढाळकर आदी उपस्थित होते. सोहळ्याचे हे ४ थे वर्ष आहे.

लक्ष्मणतात्या कोंढाळकर म्हणाले, कोंढाळकरांचे वंशज आज महाराष्ट्रामध्ये अनेक गावांमध्ये स्थायिक असून, मूळ गाव कोंढावळे, ता. वाई, जि. सातारा हे आहे. कोंढाळकर या कुटुंबाची कुलस्वामिनी आई सालपाई असून, कोंढावळे या गावात महाराष्ट्रभर विखुरलेल्या सर्व कोंढाळकर बांधवांनी एकत्र येऊन देवीचे भव्य मंदिर उभे केले आहे. याशिवाय प्रतिष्ठान अनेक सामाजिक उपक्रम देखील राबविते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.