Pimpri : पालखी मार्गावरील अतिक्रमण काढा, खड्डे बुजवा; महापौरांच्या अधिका-यांना सूचना  

एमपीसी न्यूज – आषाढीवारी पालखी सोहळ्यानिमित्त येणा-या वारक-यांसाठी सर्व प्रकारच्या सोईसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. आकुर्डीत पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पुरेशा पिण्याच्या पाण्याची, शौचालयांची, पाण्याच्या टँकरची व्यवस्था करावी. पालखी मार्गावर पुरेशी प्रकाश योजना असावी. पालखी मार्गावरचे अतिक्रमण, रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, कचराकुंड्या स्वच्छ ठेवाव्यात. पंढरपूरपर्यंत वारक-यांसाठी पर्याप्त पाण्याची व्यवस्था करावी, अशा सूचना महापौर राहुल जाधव यांनी अधिका-यांना दिल्या. दरम्यान, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे यंदा दिंडीप्रमुखांना भेटवस्तू न देता आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या परिवाराला किंवा त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे देहू येथून प्रस्थान 24 जून तर संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीचे आळंदी येथून 25 जून रोजी प्रस्थान होणार आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा पिंपरी-चिंचवड शहरातील मुक्काम 26 जून रोजी होणार आहे. यासाठी, पालखी सोहळा नियोजनाची आढावा बैठक महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात महापौर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी, वारक-यांची गैरसोय टाळण्यासाठी विविध उपाययोजना करण्यासंबंधी विविध विषयावर बैठकीत चर्चा करण्यात आली.

उपमहापौर सचिन चिंचवडे, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, सभागृह नेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा समितीचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे पाटील, योगेश देसाई, संजय मोरे, सुरेश भोईर, शहर अभियंता राजन पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त आर. एस. जाधव, सहाय्यक आयुक्त मंगेश चितळे, नगरसचिव उल्हास जगताप, सह शहर अभियंता मकरंद निकम, महावितरणचे कार्यकारी अभियंता राहुल गवारे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय, डॉ. लक्ष्मण गोफणे, मुख्य अग्निशामक अधिकारी किरण गावडे, प्रभावती गाडेकर, ज्योत्स्ना शिंदे, सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, डॉ. अरूण दगडे, पोलीस निरीक्षक सतिश नांदुरकर, माणिक मोरे, मधुकर मोरे, संतोष मोरे, काशिनाथ मोरे उपस्थित होते.

पालखी सोहळ्या दरम्यान जिल्हा परिषदेप्रमाणे दुचाकीधारक आरोग्य दूत ठेवण्याची व्यवस्था करावी. तसेच पालखी मार्गावरील मटण व दारुची दुकाने बंद असावीत. पालखी सोहळ्या समवेत पाण्याचे टँकर व वैद्यकीय सेवा सुविधांसह अॅम्बुलन्सची व्यवस्था करून द्यावी. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळयासमवेत अग्निशमन बंब देण्यात येणार आहे. श्री संत तुकाराम महाराज पालखी परतीचा प्रवास चिखली मार्गे करण्याबाबत पालखी सोहळा प्रमुखांनी सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती महापौर राहुल जाधव व विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.