Chinchwad News: नामवंत बालरोगतज्ज्ञ डॉ. अच्युत कलंत्रे यांचे निधन

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील नामवंत बालरोगतज्ज्ञ डॉ. अच्युत कलंत्रे (वय 81) यांचे आज (गुरुवारी) पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

डॉ. अच्युत कलंत्रे अनुभवी बालरोगतज्ज्ञ होते. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहाच्या बाजूला त्यांचे हॉस्पिटल होते. त्यांच्याकडे उपचारासाठी मुलांना घेऊन गेल्यानंतर पालक निर्धास्त राहत असत. डॉ. कलंत्रे पिंपरी- चिंचवड शहरातील नामवंत डॉक्टर होते.

चिंचवड रोटरी क्लबचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले होते. रोटरी क्लबच्या माध्यमातून त्यांनी समाजकार्य केले. पिंपरी-चिंचवड प्रबोधन प्रतिष्ठानचे ते अध्यक्ष होते. शिशिर व्याख्यानमालेच्या नियोजन त्यांचा सक्रिय सहभाग असायचा, दिवाळी पहाट कार्यक्रमासाठी मोठ्या हिरीरीने ते पुढाकार घेत होते.

मागील 15 दिवसांपासून ते आजारी होते. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान गुरुवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  त्यांच्या जाण्याने वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.