Repeat Telecast Of Old Serials: गतकाळाला उजाळा देणाऱ्या काही मालिकांचे पुन:प्रसारण

छोट्या पडद्यावरील गाजलेली आणि प्रेक्षकांची आवडती मालिका 'वहिनीसाहेब' आता लवकरच झी युवा या वाहिनीवर प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे.

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या काळातील लॉकडाऊन उठून आता अनलॉक सुरु झाले आहे. तीन महिन्यांपासून बंद असलेले शूटिंग आता सुरु झाली आहेत. पण अजून पुरेशा भागांचे चित्रीकरण झाले नसल्याने काही जुन्या मालिकांचे पुनःप्रसारण करण्यात येत आहे. काही वर्षांपूर्वी गाजलेल्या मालिका पुन्हा पाहायला मिळणार आहेत. छोट्या पडद्यावरील गाजलेली आणि प्रेक्षकांची आवडती मालिका ‘वहिनीसाहेब’ आता लवकरच झी युवा या वाहिनीवर प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे.

शरद पोंक्षे, सुचित्रा बांदेकर आणि भार्गवी चिरमुले सारख्या अतिशय तगड्या कलाकरांची जमलेली भट्टी पाहण्याची सुवर्णसंधी झी युवामुळे महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना मिळणार आहे.

ही मालिका ‘झी क्लासिक’ या खास सेगमेंटमध्ये 27 जुलैपासून सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 6 यावेळेत प्रेक्षकांना बघता येणार आहे.

ललित प्रभाकर आणि प्राजक्ता माळी यांना ओळख मिळवून देणारी मालिका म्हणजे ‘जुळून येती रेशीमगाठी’. या मालिकेची कथा, त्यातील व्यक्तिरेखा इतकंच नव्हे तर मालिकेचं शीर्षक गीत देखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडलं.

ललित आणि प्राजक्तासोबत ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेत उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, लोकेश गुप्ते, शर्मिष्ठा राऊत यांसारखे अनुभवी कलाकार होते.

ही मालिका देखील आता पुन:प्रसारित होणार आहे. झी युवा वाहिनीवर ही मालिका 27 जुलैपासून सोमवार ते शनिवार सायंकाळी 7 वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

सासू सुनेच्या नात्याचे भावबंध दाखवणारी, संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाच्या मनावर अधिराज्य गाजलेली महामालिका म्हणजे ‘चार दिवस सासूचे’. तेव्हाच्या ‘इ टीव्ही’वर दाखवली जाणा-या या मालिकेने वर्षानुवर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

आई आणि सासू या एकाच नाण्याच्या दोन बाजू. आईची सासू होतानाची घालमेल, तिचे विचार, तिची भीती हे कोणीच समजू शकणार नाही. मुलाचे लग्न हे आईच्या जीवनातील परमोच्च सुख.

प्रत्येक आईचे तिच्या मुलांच्या लग्नाविषयी, तिच्या होणार्‍या सुनेविषयी स्वप्न असतात. ‘चार दिवस सासूचे’ ही मालिका देखील याच कथासूत्रावर आधारलेली आहे. 3 ऑगस्टपासून रात्री 9.30 वाजता कलर्स मराठीवर ही मालिका प्रसारित होणार आहे.

या मालिकेत आशालता देशमुख यांची भूमिका ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी आणि अनुराधाची भूमिका कविता लाड-मेढेकरने साकारली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.