Repeater Exam : दहावी-बारावीची फेरपरीक्षा नोव्हेंबर – डिसेंबरमध्ये ; अर्ज प्रक्रिया सुरू

एमपीसी न्यूज – राज्यातील दहावी आणि बारावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया राज्य मंडळाकडून सुरू करण्यात आली असून, विद्यार्थ्यांना 20 ते 29 ऑक्टोबर दरम्यान नियमित शुल्कासह आणि 30 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबरदरम्यान विलंब शुल्कासह अर्ज करता येणार आहे.

दरवर्षी दहावी-बारावीच्या निकालानंतर अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्टमध्ये होणारी पुरवणी परीक्षा यंदा कोरोना संसर्गामुळे होऊ शकली नाही. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पुरवणी परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.

पुरवणी परीक्षा आणि श्रेणीसुधारसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज करता येणार आहे.

श्रेणीसुधारसाठी विद्यार्थ्यांना नोव्हेंबर-डिसेंबर 2020 आणि फेब्रुवारी मार्च 2021 अशा लगतच्या दोनच संधी उपलब्ध असतील.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना फेब्रुवारी मार्च 2020 च्या परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना त्यांची या परीक्षेची माहिती आवेदन पत्रात ऑनलाइन पद्धतीने घेता येईल.

विद्यार्थ्यांनी अर्ज भरल्यानंतर शाळांनी दिलेल्या मुदतीत ऑनलाइन पैसे भरून त्याची पोचपावती आणि विद्यार्थ्यांची यादी विभागीय मंडळाकडे सादर करावी. अर्ज करण्यास मुदतवाढ दिली जाणार नाही, असे मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.