Pune : अनधिकृत होर्डिंग्जवरील कारवाईचा अहवाल द्या – उपमहापौर 

एमपीसी न्यूज – राजकीय नेत्यांच्या आशीर्वादामुळे शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत होर्डिग्जची संख्या वाढलेली आहे. या होर्डिग्जवर तत्काळ कारवाई करून ती जमीनदोस्त करावी; तसेच संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेडे यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. अनधिकृत होर्डिंग्जवर काय कारवाई केली, यासंबंधीचा अहवाल सादर करावा, असा आदेशही उपमहापौरांनी आयुक्तांना दिला आहे.

दरम्यान , शुक्रवारी पुण्यातील शाहीर अमर शेख चौकात होर्डिंगचा सांगाडा पडून चार लोकांना हकनाक आपला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे आता महापालिका चांगलीच कामाला लागली आहे.  शहरात सुमारे अडीच हजार होर्डिंग अनधिकृत आहेत. 4 लोकांनी आपला जीव गमावल्यावर आता महापालिकेला जाग आली आहे. आणि त्यानुसार कारवाईला सुरवात झाली आहे. या कारवाईचा  अहवाल आता उपमहापौरांनी मागितला आहे.

_MPC_DIR_MPU_II

शहरामध्ये राज्य शासन आणि पालिकेच्या मुख्य सभेने होर्डिग्जचे धोरण मान्य केले आहे. त्याला न्यायालयानेही मान्यता दिलेली आहे. या होर्डिंग्जची नियमावली मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम कलम २४४, २४५ नुसार व २००३ च्या नियमावलीप्रमाणे अस्तित्वात आहे. यामुळे शहरातील अनधिकृत होर्डिंग्जवर त्वरित कारवाई करावी आणि अनधिकृत होर्डिंग्ज उभारणा-यांवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा.

ही कारवाई करीत असताना कुठल्याही प्रकारच्या राजकीय दबावाला भिक टाकू नये. त्याचा अहवाल आपण सादर करावा. तसेच, अनधिकृत होर्डिंग्जवर काय कारवाई केली, यासंबंधीचा अहवाल त्वरित सादर करावा, असा आदेशही उपमहापौरांनी आयुक्त सौरभ राव यांना दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.