Pimpri : ‘प्राधिकरणातील मिळकतीमध्ये महसूल विभागाप्रमाणे वारसाचे नाव नोंदवा’

आमदार महेश लांडगे यांची प्राधिकरणाच्या अध्यक्षांकडे मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या क्षेत्रामधील वारस नोंद ही मृत्यू दाखला व जाबजबाब देऊन सक्षम अधिका-यांकडून अथवा नगर भूमापन अधिकारी यांच्याकडून देण्यात येणा-या वारस नोंदीप्रमाणे वारस नोंद करण्यात यावी. महसूल विभागामार्फत देण्यात येणा-या वारस दाखल्यानुसार वारस नोंद करावी. त्याबाबतचा ठराव प्राधिकरणाच्या सभेत मंजूर करावा, अशी मागणी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये आमदार महेश लांडगे यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण क्षेत्रामधील वारस नोंदी या ‘भूवाटप नियमावली’ नुसार करण्यात येतात. प्राधिकरण क्षेत्रामधील मूळ भाडेपट्टाधारक याच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसाच्या नावे मिळकत होण्यासाठी प्राधिकरणाकडून न्यायालयाकडील वारसा दाखल्याची किंवा सिटी सर्व्हेच्या मंजूर नोंद प्रतीची मागणी केली जाते. ही प्रक्रिया खर्चिक आणि वेळखाऊ आहे. प्राधिकरणाकडून सर्व पेठांमध्ये सिटी सर्व्हे अद्ययावत झालेला नाही. त्यामुळे सिटी सर्व्हेची मंजूर नोंद प्रत मिळू शकत नाही. त्यामुळे वारसाची नोंद होण्यासाठी न्यायालयाचा वारस दाखला घेणे क्रमप्राप्त होते.

इतर क्षेत्रात एखाद्या मिळकतीची वारस नोंद ही सक्षम अधिकारी किंवा नगर भूमापन अधिकारी यांच्याकडे मृत्यू दाखला सादर केला जातो. त्यानंतर जाबजबाब देऊन वारस नोंद करण्यात येते. त्याचप्रमाणे प्राधिकरण क्षेत्रामध्ये देखील वारस नोंद ही मृत्यू दाखला व जाबजबाब देऊन सक्षम अधिका-याकडून अथवा भूमापन अधिकारी यांच्याकडून देण्यात येणा-या वारस नोंदीप्रमाणे वारस नोंद करण्यात यावी. गेल्या अनेक वर्षांपासून प्राधिकरणातील नागरिकांची ही मागणी आहे. नागरिकांच्या मागणीचा विचार करुन वारस नोंद करण्यासाठी महसूल विभागामार्फत देण्यात येणा-या वारस दाखल्यानुसार वारस नोंद करण्यात यावी. वारस नोंदीबाबतचा आवश्यक तो ठराव करावा. त्याला प्राधिकरणाच्या सभेत मंजुरी घेऊन पुढील कार्यवाही करावी, अशी विनंती आमदार लांडगे यांनी केली आहे.

आमदार महेश लांडगे म्हणाले, “प्राधिकरणातील नागरिकांना वारस नोदींसाठी किचकट प्रक्रियेला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी प्राधिकरण क्षेत्राव्यतिरिक्त मिळकतीच्या वारस नोंदीच्या प्रक्रियेनुसारच प्राधिकरणातील मिळकतीची वारस नोंद करण्यात यावी. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.