Pimpri : सहाय्यक आयुक्तांच्या कामकाजाचे पुन्हा फेरवाटप 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सहाय्यक आयुक्तांच्या कामकाजाचे पुन्हा फेरवाटप केले आहे.  आकाश चिन्ह परवाना विभागाचे सुनील वाघमारे यांच्याकडे एलबीटी विभागाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. तर, सत्ताधा-यांनी निष्क्रियतेचा ठपका ठेवलेल्या स्मिता झगडे यांच्यावर आयुक्त मेहरबान झाले आहेत. त्यांच्याकडे महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत असलेला करसंकलन विभाग सोपविला आहे. 

आकाशचिन्ह विभागाचे सहायक आयुक्त सुनील वाघमारे यांच्याकडे करसंकलन विभागाचा पदभार होता. मात्र आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी वाघमारे यांच्याकडील हा विभाग काढला आहे. विविध कारणांनी वादग्रस्त ठरलेल्या स्मिता झगडे यांच्यावर मेहरबानी करत त्यांच्याकडे करसंकलन विभाग दिला आहे. करसंकलन विभाग महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत असताना झगडे यांच्याकडे हा विभाग दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

स्मिता झगडे आणि वाद…

महापालिकेत रुजू झाल्यापासून झगडे विविध कारणांनी वादग्रस्त ठरल्या आहेत. तत्कालीन स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, आशा शेंडगे यांनी झगडे यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतले होते. स्मिता झगडे या निष्क्रीय असल्याचा आरोप करत त्यांना राज्यसेवेत परत पाठविण्याची मागणी जैवविविधता समितीच्या सभापती उषा मुंडे यांनी केली होती.

सत्ताधारी भाजपचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनीही क्षेत्रीय अधिकारी स्मिता झगडे यांचे ‘ग’ प्रभागाकडे लक्ष नसल्याचा आरोप करत कार्यालयाच्या आवारात कचरा फेकला होता. तसेच झगडे या निष्क्रिय अधिकारी आहेत. त्यांना कामकाज व्यवस्थितपणे हाताळता येत नाही. आजपर्यंत त्यांना प्रभागातील कोणतीही समस्या सक्षमपणे हाताळता आली नाही. त्यांना मुख्यालयातून प्रभागातील समस्या पाहण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यांचे प्रभागाकडे लक्ष नसल्याचा आरोपही वाघेरे यांनी केला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.