Pune : इंडियन फ्लॅपशेल टर्टल आणि जळवांविषयी शोधनिबंध प्रसिद्ध

एमपीसी न्यूज : इंडियन फ्लॅपशेल टर्टल आणि परजीवी जळवांविषयी पुण्यातील (Pune) निसर्ग अभ्यासक व अलाईव्हचे अध्यक्ष उमेश वाघेला यांचा शोधनिबंध आंतरराष्ट्रीय जर्नल ‘झुझ प्रिंट’मध्ये नुकताच प्रसिद्ध झाला आहे. या भारतीय फ्लेपशेल कासव आणि गोड्या पाण्यातील ‘जॉ-लेस’ जळवांचे सहजीवनावरील भारतातील ही पहिलीच नोंद आहे.
Maharashtra : राज्य शासनाच्या स्वच्छ मुख अभियानाचे भारतरत्न सचिन तेंडुलकर होणार सदिच्छादूत
इंडियन फ्लॅपशेल कासव हे गोड्या पाण्यातील मृदु कवच कासव आहे. जे संपूर्ण भारतात आणि भारतीय उपखंडाच्या इतर भागात जलाशय, नद्या आणि तलावांमध्ये आढळते. हे सर्वभक्षी कासव असून प्रामुख्याने जलचर वनस्पती, वनस्पतींची पाने, फळे आणि लहान जलचर प्राण्यांवर अवलंबून आहे.
नोव्हेंबर २०२० रोजी सर्पमित्र गणेश फाळके यांना मावळ तालुक्यात थुगाव-कामशेत रस्त्याच्या मधोमध ओढ्याजवळ एक कासव सापडले. फाळके यांनी तत्काळ कासव रेस्क्यू केल्यामुळे ते संभाव्य रस्ते अपघातापासून वाचले. याची माहिती निसर्ग अभ्यासक व अलाईव्हचे अध्यक्ष उमेश वाघेला यांना दिली. कासवाला कोणतीही जखम नव्हती. परंतु रेस्क्यू केलेले कासव लहान असून अनेक परजीवी जळवांनी ग्रस्त होते.
चिमटीच्या उपयोग करुन सर्व जळवा काळजीपूर्वक काढून टाकण्यात आले. कासवाच्या मानेवरुन काढलेल्या जळवांची संख्या तब्बल 25 एवढी होती. त्यानंतर हे कासव फाळके यांनी जवळच्या पवना नदीत मुक्त करण्यात आले. महाराष्ट्र शासन वन विभाग, पुणे विभागाला कासवाची रेस्क्यू व निसर्गात पुन्हा मुक्त केल्याची माहिती देण्यात आली होती.
इंडियन फ्लॅपशेल टर्टल आणि त्यावरील जळवांचा सहजीवना विषयी निसर्ग अभ्यासक उमेश वाघेला यांच्या सुमारे अडीच वर्ष संशोधनाने आंतरराष्ट्रीय जर्नल ‘झुझ प्रिंट’मध्ये शोधनिबंध नुकताच प्रसिद्ध झाला आहे. उमेश वाघेला म्हणाले, “गोड्या पाण्यातील ‘जॉ-लेस’ जळवा प्रोबोसिसने सुसज्ज असतात.
जळवांच्या बहुतेक प्रजाती परजीवी (इक्टोपॅरासाइट्स) असतात, ज्या यजमानांचे रक्त शोषून जगतात. बर्याचदा पृष्ठवंशी प्राण्यांच्या विशिष्ट गटांवर ते अवलंबून असतात. उदाहरणार्थ, पिसिकोलिडी कुटुंब प्रामुख्याने माशांच्या रक्तावर आहार घेते, जरी काही जण ऑलिगोचेट्स आणि गोड्या पाण्यातील गोगलगाई सारख्या अपृष्ठवंशी प्राण्यांचे सेवन करतात. भारतीय फ्लॅपशेल कासवाचा गोड्या पाण्यातील जळवांशी संबंध असल्याची कोणतीही विशिष्ट नोंद अद्याप नव्हती.
ग्लॉसिफोनिडी फॅमिलीच्या गोड्या पाण्यातील ‘जॉ-लेस लीचेस’ आणि ‘भारतीय फ्लॅपशेल टर्टल’च्या सहवासाची ही भारतातील पहिलीच नोंद असून ते पुणे जिल्ह्यातून झाली आहे. कासवांवर जळवांचा काय परिणाम होतो हा अद्याप संशोधनाचा विषय आहे. हा संबंध परजीवी आहे की सहजीवी हे तपासणे बाकी आहे, या संदर्भात कासवावरील जळवांचा परिणामांवर अधिक अभ्यास करणे आवश्यक आहे.”
अमेरिकेतील स्मिथसोनियन्स नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री, अपृष्ठवंशी प्राणी शास्त्र विभागातील रिसर्च झूलॉजिस्ट, परजीवी कृमी, जळवा आणि पक्षी टेपवर्म्सच्या तज्ज्ञ एनालिडा यांनी जळवा ओळखण्यात मदत केली. झुलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. अनिल महाबळ आणि पुणे (Pune) विद्यापीठेचे डॉ. भालचंद्र पुजारी यांचे मार्गदर्शन लाभले.