Pune News : 28 आणि 40 या दोन प्रभागातील आरक्षण बदलली

एमपीसी न्यूज – पुणे, प्रभाग रचना अंतिम करताना लोकसंख्येतील बदलांमुळे प्रारूप प्रभाग रचनेतील प्रभाग क्र. 28 आणि 40 मधील अनुसूचित जाती चे आरक्षण उठले असून अंतिम प्रभाग रचनेत प्रभाग क्र. 42 आणि 47 मध्ये आरक्षण पडले आहे. प्रभाग रचना अंतिम करताना लोकसंख्या व अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या टक्केवारीत बदल झाल्याने आरक्षण बदल झाले आहेत.

प्रारूप प्रभाग रचनेमध्ये प्र. क्र. 28 महात्मा फुले स्मारक टिंबर मार्केट मधील लोकसंख्या 67 हजार 292 होती. त्यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या 10 हजार 262 होती. अंतिम रचनेमध्ये या प्रभागात बदल झाला आहे. या प्रभागाचे नाव महात्मा फुले स्मारक – भवानी पेठ असे करण्यात आले व काही भाग वगळण्यात आला.

यानंतर या प्रभागाची लोकसंख्या 57 हजार 463 इतकी झाली. त्यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या 7 हजार 137 पर्यंत कमी झाली. प्रभाग क्र. 40 गंगाधाम सॅलसबरी पार्क ) या प्रभागात प्रारूप प्रभागरचनेत 59 हजार 882 लोकसंख्या होती. त्यामध्ये 8 हजार 46 लोकसंख्या अनुसूचित जातीची होती. अंतिम प्रभाग रचनेत या प्रभागाचे नाव बिबवेवाडी गंगाधाम असे झाले. या प्रभागाला नवीन काही भाग जोडल्याने लोकसंख्या 62 हजार 740 झाली. त्यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या 8 हजार 167 झाली.

दुसरीकडे प्रभाग क्र. 47 कोंढवा येवलेवाडी प्रभागामध्ये काही भाग नवीन जोडला तर काही वगळला आहे. यामुळे प्रारूप प्रभाग रचनेत या ठिकाणी असलेली 55 हजार 662 ही लोकसंख्या अंतिम रचनेत 54 हजार 492 इतकी कमी झाली. मात्र अनुसूचित जातीची प्रारूप रचनेत असलेली 6 हजार 969 इतकी लोकसंख्या 9 हजार 206 पर्यंत वाढली. यामुळे प्रभागातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत अनुसूचित जातीच्या लोकसंख्येची टक्केवारी वाढल्याने अंतिम रचनेत येथे आरक्षण पडले आहे.

प्रारूप प्रभाग रचनेतील प्र. क्र. 42 सय्यद नगर लुल्लानगर या प्रभागाचे नाव अंतिम रचनेत रामटेकडी सय्यद नगर केले गेले. अंतिम रचना करताना यामध्ये मोठया प्रमाणावर मोडतोड करण्यात आली आहे.

प्रारूप रचनेत या प्रभागाची लोकसंख्या 57 हजार 764 होती. त्यामध्ये 6 हजार 108 अनुसूचित जातीची लोक संख्या होती. अंतिम रचनेत या प्रभागची लोकसंख्या 49 हजार 25 इतकी कमी झाली. मात्र रामटेकडीतील काही भाग जोडल्याने अनुसूचित जातीची लोकसंख्या 9 हजार 370 पर्यंत पोहोचली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.