BNR-HDR-TOP-Mobile

Chikhali: घरकुल प्रकल्पातील गुंडगिरीने हैराण रहिवाशांचा पोलीस आयुक्तालयावर रात्री धडक मोर्चा

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चिखली येथील गृहप्रकल्पात गुंडांच्या टोळीने मांडलेल्या उच्छादामुळे हैराण झालेल्या रहिवाशांनी आज रात्री थेट पोलीस आयुक्तालयावर धडक मोर्चा काढला. घरकुल प्रकल्पात दहशत माजविणाऱ्या गुंडांवर तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस उपायुक्तांनी दिल्यानंतर अखेर आंदोलन मागे घेण्यात आले.

चिखली येथील घरकुल प्रकल्पामध्ये गुंडांची एक टोळी सक्रिय झाली असून त्यांच्या गुंडगिरीने परिसरातील रहिवासी हैराण झाले आहे. दमदाटी, मारामारी, हाप्तेवसुली असा त्रास या गुंडाकडून दिला जात असल्याची रहिवाशांची तक्रार आहे. यासंदर्भात वारंवार पोलिसांकडे तक्रार करून देखील गुंडगिरीला पायबंद बसत नसल्याने नागरिक संतप्त आहेत.
प्रकल्पातील एका दुकानदाराने हप्ता देण्यास नकार दिल्याने या गुंडांच्या टोळक्याने त्याच्या दुकानाची तोडफोड केली. त्यामुळे रहिवाशांच्या संतापाचा आज उद्रेक झाला. सुमारे 30 ते 40 रहिवाशांनी त्यांच्या दुचाकी वाहनांवरून थेट चिंचवडच्या प्रेमलोक पार्कमधील पोलीस आयुक्तालयावर धडक मोर्चा काढला. त्या ठिकाणी पोलीस उपायुक्तांची भेट घेऊन त्यांचे या समस्येकडे लक्ष वेधले. या प्रकरणी तातडीने कारवाई करून गुंडगिरीचा बिमोड केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
HB_POST_END_FTR-A4

.