Pune News : आपल्या हिंदू मानबिंदुंची पुन:स्थापना म्हणजे राम मंदिर उभारणी – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज : हजारो वर्षांपूर्वी आपल्या देशावरील आक्रमकांच्या हल्ल्यात आपले मानबिंदू उद्ध्वस्त केले गेले, त्याची पुन:स्थापना म्हणजे अयोध्येत प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर उभारणे आहे, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. 

नगरसेवक आणि पुणे शहर भाजपा सरचिटणीस दीपक पोटे यांच्या संकल्पनेतून एरंडवणे येथील राजा मंत्री उद्यानाच्या प्रवेशद्वारावर अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या मंदिराचे डिजिटल बोधचिन्ह आणि पुण्यातील ऐतिहासिक वास्तूंच्या प्रतिकृतींचे लोकार्पण पाटील यांच्या हस्ते झाले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

पाटील म्हणाले की, हजारो वर्षांपूर्वी आपल्या देशावर आक्रमकांनी देशावर राज्य करण्यासाठी ज्या नितीचा अवलंब केला, त्यात आपले मानबिंदू उद्ध्वस्त करण्याला प्राधान्यक्रम होता. यात त्यांनी आपल्या श्रद्धास्थानांना धक्का लावत मंदिरे उद्ध्वस्त केली. अयोध्येतील प्रभू श्रीरामांचे मंदिर हे त्यापैकीच एक होते. त्यासोबतच स्त्रीला भ्रष्ट देखील केले जात होते. त्यामुळे आपल्या मानबिंदुंची‌ पुन: स्थापना करणे म्हणजे राम मंदिर उभारणी आहे.

ते पुढे म्हणाले की, आपल्या देशात सर्वांना आपापल्या धर्मानुसार पूजा पद्धतीचं स्वातंत्र्य आहे. प्रत्येकजण आपापल्या धर्मानुसार आपल्या आराध्यांची पूजा करु शकतो. पण त्यावर अतिक्रमण किंवा आघात कधीही खपवून घेतला जाणार नाही. मोठ्या प्रमाणांत आमच्या मुलींना आकर्षणं दाखवून पळवून नेऊन धर्मांतर केलं जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तोच प्रकार होत आहे. आपल्या मानबिंदुंना धक्का लावला जातो आहे. पण आता हिंदू जागृत झाला आहे. आता असले प्रकार चालणार नाहीत, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.