Pune : शहरातील ‘एचसीएमटीआर’ प्रकल्पाची पुनर्रचना करा ; शिवसेनेची महापालिका आयुक्तांकडे मागणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेही पाठपुरावा करणार ; गटनेते पृथ्वीराज सुतार यांचा इशारा

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील ‘एचसीएमटीआर’ प्रकल्पाची पुनर्रचना करा, अशी मागणी शिवसेनेतर्फे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे करण्यात आली आहे. आपल्या पत्राचा विचार करून कोणतीही घाईगडबड करणार नाही. आपण या प्रकल्पाची सर्व प्रोसेस थांबविली आहे. या प्रकल्पासाठीचा 8 हजार कोटींचा खर्च महापालिकेला परवडणारा नसल्याचे आयुक्तांनी सांगितले, अशी माहिती शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

नगररचना विभागाने 40 वर्षांपूर्वी पुणे शहराच्या वाहतूक गरजांचा अभ्यास करून पुणे शहरासाठी ‘एचसीएमटीआर’ रस्त्याची विकास आराखड्यात आखणी केली. आता 32 वर्षांनंतर या प्रकल्पाचे काम महापालिका प्रशासनाने हाती घेतले आहे. गेल्या 3 दशकांत शहराच्या हद्दीची अनियोजित व बेसुमार वाढ झाली आहे. लोकांची राहण्याची, येण्या-जाण्याची ठिकाणे व मार्ग बदलले आहेत. शहराच्या सीमा खूप विस्तारल्या आहेत. शहराच्या बाह्य भागांतून योजलेला ‘एचसीएमटीआर’ प्रकल्प आता शहराच्या आत विकसित भागांतून जाणार आहे.

या प्रकल्पाचे मूळ स्वरूप देखील बदलण्यात आले आहे. खाजगी वाहनांना या प्रकल्पावर प्रवेश देण्यात येणार आहे. विकसित झालेल्या कित्येक निवासी भागांतून हा प्रकल्प जाणार आहे. इमारती पाडल्या गेल्यास लोकांचे विस्थापन होईल. इमारतीच्या जवळून हा प्रकल्प गेल्यास रहिवाशांना खूप त्रास सहन करावा लागेल. खाजगी जमीन ताब्यात घेणे जिकिरीचे होईल. याचा खर्च देखील प्रचंड होईल.

टेकड्या, उद्याने, वृक्षराजीतून हा प्रकल्प जात असल्याने पर्यावरणाची अपरिमित हानी होईल. काही वारस स्थळांनाही धक्का पोहोचणार असल्याची भीती आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, नगरसेवक संजय भोसले, अविनाश साळवे, बाळा ओसवाल, विशाल धनवडे, प्रमोदनाना भानगिरे, श्वेता चव्हाण, पल्लवी जावळे, संगिता ठोसर, प्राची आल्हाट यावेळी उपस्थित होते.

‘एचसीएमटीआर’ प्रकल्पाचा ‘डीपीआर’ तयार नाही. ‘अलायमेंट’ अजून अंतिम नाही. आवश्यक भूसंपादन नाही. अशा परिस्थितीत प्रकल्पाचे टेंडर का? आणि कसे काढले गेले? याचे स्पष्टीकरण महापालिकेने दिले पाहिजे. शासनाचे निर्देश पायदळी तुडवून महापालिका प्रशासन मनमानी कारभार करीत आहे. त्यामुळे या प्रकल्पाची कार्यवाही थांबवावी. पूर्ण पुनर्वालोकन करून प्रकल्पाची फेररचना करण्यात यावी. अन्यथा जे जे अधिकारी, सल्लागार, कंपनी यामध्ये दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेही पाठपुरावा करणार असल्याचा इशाराही पृथ्वीराज सुतार यांनी दिला.

शिवसेनेचा या प्रकल्पाला विरोध नाही. तर, ज्या चुकीच्या पद्धतीने हा प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न प्रशासन करीत आहे. त्याला आमचा विरोध आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी व पुणेकरांचे हित जोपासण्यासाठी शहराच्या सद्य परिस्थितीचा विचार करून नवीन पुनर्रचना करावी, अशी मागणी असल्याचे बाळा ओसवाल, विशाल धनवडे आणि पल्लवी जावळे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.