Result News : मूल्यांकनानंतरचे बोर्डांचे निकाल 31 जुलैपूर्वी जाहीर करा; सुप्रीम कोर्टाचे सर्व राज्यांना निर्देश

एमपीसीन्यूज : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांनी तसेच सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाने दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द केल्या. मात्र, आता सर्व बोर्डांच्या मूल्यांकनाच्या पद्धती वेगवेगळ्या असल्यामुळे विद्यार्थ्यांना निकालाची चिंता लागली आहे. कारण याच गुणांच्या आधारावर पुढील वर्षीच्या प्रवेश प्रक्रिया होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आता थेट सर्वोच्च न्यायालयानेच सर्व राज्यांमधील बोर्डांना मूल्यांकनानंतरचे निकाल 31  जुलैपूर्वी लावण्याचे आदेश दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशाने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सीबीएसई आणि आयसीएसईच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने ही याचिका रद्द केली. तसेच परीक्षा रद्द करण्याचा निर्णय योग्य असल्याचं स्पष्ट केलं होतं.

त्यावेळी विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनासाठी निवडण्यात आलेल्या 30:30:40 फॉर्म्युल्यावर आक्षेप घेणारी याचिका देखील दाखल करण्यात आली होती. ती याचिका देखील रद्द ठरवत न्यायालयाने मूल्यांकनाची पद्धती योग्य असल्याचे स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर आता न्यायालयाने देशातील सर्वच राज्यांमधील बोर्डांना 31  जुलैपूर्वी निकाल जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.