Maval : अतिवृष्टीच्या ‘ब्रेक’ नंतर सुनील शेळके यांच्या गाव भेट दौऱ्यास पुन्हा प्रारंभ

वाजंत्री, हलगी, ढोल-ताशांच्या दणदणाटात गावागावात उत्स्फूर्त स्वागत

एमपीसी न्यूज – मावळ विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार असलेले तळेगाव दाभाडेचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांच्या गाव भेट दौऱ्याला आज (मंगळवारी) सकाळी उर्से येथून पुन्हा नव्या उत्साहात प्रारंभ झाला. तालुक्यातील अतिवृष्टीने हा दौरा 16 दिवस स्थगित ठेवण्यात आला होता. वाजंत्री, हलगी, ढोल-ताशांच्या दणदणाटात मिरवणुका काढून तसेच सुवासिनींनी औक्षण करून शेळके यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. येलघोलमधील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सोपान घारे, भानुदास घारे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. 

उर्से गावची ग्रामदेवता श्री पद्मावती देवीच्या मंदिरात दर्शन घेऊन शेळके यांनी गाव भेट दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यास सुरूवात केली. ग्रामस्थांच्या वतीने शेळके यांचे स्वागत करण्यात आले तसेच त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. शेळके यांनीही गावातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. भाजपबरोबरच शिवसेना, रिपब्लिकन पक्ष तसेच महायुतीतील घटकपक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून शेळके यांना चांगला पाठिंबा मिळत आहे. शेळके यांच्या दौऱ्यात नगरसेवक संदीप शेळके तसेच जालिंदर धामणकर, भारत ठाकूर, प्रदीप धामणकर, सरपंच आश्विनी शिंदे, अंकुश सुतार, रामदास सुतार, शंकर देशमुख, बबन ठोंबरे, पप्पू दाभाडे, बाळू वरघडे, किरण शेडगे, रमेश आडकर, विजय लोहोर, बाळू आडकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

येलघोलमध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सोपान घारे, भानुदास घारे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. शेळके यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. सुनील शेळके यांच्या सक्षम व दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वामुळे मावळच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास सोपान घारे यांनी यावेळी व्यक्त केला. गाव भेट दौऱ्यात शेळके यांनी आज उर्से, आढे, ओझर्डे, सडवली, बौर, बौरवाडी, आर्डव, येलघोल, धनगव्हाण, भडवली, शिवली, कोथुर्णे, मळवंडी ठुले आणि वारू या गावांमधील ग्रामस्थांशी संवाद साधला. ग्रामदैवताचे दर्शन व ज्येष्ठांचा आशीर्वाद असे या गाव भेटीची स्वरूप आहे. पावसाने उघडीप घेतल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावल्याचे पाहायला मिळत होते.

सुनील शेळके यांनी गेल्या पाच वर्षांत मावळ तालुक्यात विविध कार्यक्रम व विकासकामांच्या माध्यमातून गावोगाव संपर्क वाढवत जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. निवडणुका तोंडावर आलेल्या असताना त्यांनी भाजपचा झेंडा घेऊन गाव भेट दौरा सुरू केला आहे. जोरदार शक्तीप्रदर्शन करीत त्यांनी तीन ऑगस्टला शिरगाव येथून या दौऱ्यास प्रारंभ केला. पहिल्या दिवशी शिरगाव, गहुंजे, साळुंब्रे, गोडुंब्रे, सांगवडे, दारुंब्रे, चांदखेड, बेबेडओहोळ, धामणे, परंदवडी व सोमाटणे या गावांना शेळके यांनी भेट दिली व गामस्थांशी संवाद साधला होता. पाऊस असतानाही प्रत्येक गावात शेळके यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले, मात्र त्यानंतर तालुक्यात अतिवृष्टी सुरू झाल्याने ग्रामस्थ व कार्यकर्त्यांच्या सुरक्षितेचा विचार करून हा दौरा स्थगित करण्यात आला होता. तो आता नव्या जोमाने पुढे सुरू करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.