Chinchwad : कोरोना नियमभंग करणाऱ्यांवर पुन्हा कारवाई सुरु

शनिवारी 212 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज – कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने निर्बंधांची नव्याने नियमावली जाहीर केली आहे. गर्दी होणार नाही, सुरक्षित अंतर राखले जाईल आणि कोरोनाचा वाढता प्रसार रोखला जाईल यासाठी पुन्हा काही प्रमाणात निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे पोलिसांनी देखील नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम पुन्हा सुरू केली आहे. शनिवारी (दि. 20) 212 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे प्रशासनाने खबरदारी म्हणून सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही याची खबरदारी घेणे, मास्क, सॅनिटायझर वापरणे, सुरक्षित अंतर राखणे हे निर्बंध पुन्हा एकदा कठोर करण्यात आले आहेत. रेल्वे, बस प्रवासानंतर सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे आढळून आल्यास तात्काळ कोरोनाची चाचणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या आहेत.

शाळा, सिनेमागृह, नाट्यगृह, मॉल, व्यायामशाळा, मंदिर, उद्याने यांसारख्या गर्दी होणाऱ्या ठिकाणी पोलिसांची पथके वेळोवेळी भेट देणार आहेत. मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर न पाळणाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई केली जाणार आहे. तसेच हॉटेल, नाट्यगृह, सिनेमागृह, आणि इतर सर्व अस्थापनांकडून नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित आस्थापनांना सुरुवातीला नोटीस देण्यात येईल. तरीही नियम न पाळल्यास आस्थापना 15 दिवसांसाठी सील करण्याचे आदेश देखील जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.

पिंपरी चिंचवड शहरात नियमभंग करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 188 नुसार कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. कारवाईची ही मोहीम मागील काही दिवसात थंड पडली होती. शनिवारी एकाच दिवशी 212 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

शनिवारी केलेली कारवाई –
एमआयडीसी भोसरी (11), भोसरी (6), पिंपरी (9), चिंचवड (52), निगडी (22), आळंदी (17), चाकण (13), दिघी (4), म्हाळुंगे चौकी (26), सांगवी (7), वाकड (14), हिंजवडी (5), देहूरोड (12), तळेगाव दाभाडे (0), तळेगाव एमआयडीसी (13), चिखली (0), रावेत चौकी (0), शिरगाव चौकी (1)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.