Pimpri : पूरग्रस्त गावांना मदतीचा हात द्या, महसूलमंत्री पाटील यांचे आवाहन 

एमपीसी न्यूज – मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मोठ्या प्रमाणावर निधी जमा होत आहे. याखेरीज भाजपचे राज्यभरातील सुमारे 20 हजार लोकप्रतिनिधी 1 महिन्याचे मानधन ‘आपदा’ निधीसाठी देत आहेत. पिंपरी-चिंचवडमधूनही भाजपच्या लोकप्रतिनिधींनी 51 लाखांचा मदतीचा धनादेश आपल्याकडे सुपूर्त केला आहे. पूरग्रस्त गावांसाठी सर्वांनी मदतीचा हात देण्याचे आवाहन राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. 

पिंपरीत पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, आपत्ती मोठी आहे. सरकार आपल्या परीने मदत करत आहे. परंतु, नागरिकांनी देखील मदत करणे आवश्यक आहे. भाजपचे 20 हजार लोकप्रतिनिधी 1 महिन्याचे मानधन ‘आपदा’ निधीसाठी देत आहेत. त्यातून पूरग्रस्त भागातील 100 शाळांची दुरुस्ती केली जाणार आहे.

मंदिर, शाळा, चावडी, बँक, पोस्ट ऑफीस अशी कार्यालये होऊन गाव तयार होते. पूरामुळे कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील या कार्यालयांचे नुकसान झाले आहे. त्यासाठी सर्वांनी एक-एक जबाबदारी घेणे आवश्यक आहे.

भोसरीचे आमदार महेश लांडगे शंभर गावांमधील तालमींच्या दुरुस्तीचे काम हाती घेणार आहेत. या धर्तीवर पूरग्रस्त गावातील गावांच्या पुनर्वसनासाठी इतरांनीही पुढाकार घ्यावा. पूरग्रस्त भागातील मुलींच्या विवाहाचा खर्च, शाळा उभारणी, मंदिर उभारणी अशा वेगवेगळ्या कामांसाठी सहकार्य करण्याचे आवाहनही पाटील यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.