BNR-HDR-TOP-Mobile

चित्रपट “ कृतांत , नियती आणि वास्तव यांचा संघर्ष

INA_BLW_TITLE

(दीनानाथ घारपुरे)

एमपीसी न्यूज- माणूस आपल्या मनाप्रमाणे वागतो, आपल्या कष्टाचे सारे काही मिळवीत असतो, त्यासाठी नशिबाची साथ मिळणे आवश्यक असते, आपण जीवन जगत असताना आजूबाजूच्या परिस्थितीचा, कुटुंबाचा विचार करायला हवा. इतरांच्या साठी वेळ काढायला हवा, आपल्याला तीच माणसे उपयोगी पडतात अश्याच मध्यवर्ती कल्पनेवर आधारित “ कृतांत “ ह्या सिनेमाची कथा सादर केली आहे.

ही कथा आहे सम्यक, रेवा आणि त्यांच्या कुटुंबियांची, सम्यक हा तरुण तडफदार मुलगा एका मोठया कंपनीत चांगल्या पदावर काम करीत असतो. त्याला त्याच्या कामापुढे काहीच सुचत नाही, त्याची आई त्याला सांगते कि आपल्या गावी एक दिवस जाऊन येऊया पण तो तयार नसतो, पण दिवस त्याचे मित्र बाहेर गावी पिकनिक ला जायची योजना आखतात, आणि सम्यक ला आग्रह करतात, कसाबसा तो तयार होतो. त्याचे मित्र पिकनिक ला पुढे जातात आणि सम्यक आपले काम उरकून तेथे जाण्यास निघतो, पण वाटेत एका जंगलात फसतो तिथे याला एक अवलिया व्यक्ती भेटते आणि कथानकाचे नाट्य सुरु होते, तेथून चित्रपट गूढता येऊ लागते, नेमके काय होते ते सिनेमात कळेल.

सम्यक ला भेटलेली व्यक्ती हि नेमकी कोण असते. ती त्याला जीवनाचे तत्वज्ञान सांगते, कुठलीही गोष्ट सहज मिळत नाही, त्यासाठी काही काळ “ थांबणे “ गरजेचे असते, त्याव्यक्ती चा पेहराव विचित्र, केस पिंजारलेले, ती व्यक्ती सांगते, आपले जीवन नियती ठरवीत असते, तिच्या मनातले कोणालाच कळत नाही, ती आपणाला अनेकदा पुढील घटना काय आहेत ह्याची जाणीव करून देते पण आपण तसेच पुढे जातो आणि पुढे गेल्यावर मागे मिळालेल्या संकेताची आठवण होते पण तो पर्यंत उशीर झालेला असतो. कर्मयोग आणि तत्वज्ञान ह्यावरती सिनेमा भाष्य करतो. प्रत्येकांनी आत्मपरीक्षण करावयास हवे असा संदेश कळत न कळत दिलेला आहे.

संदीप कुलकर्णी यांनी अनोळखी व्यक्तिरेखा उत्तमपणे साकारलेली आहे, त्याचे एकटेपण, निसर्गाविषयी ची आपुलकी इत्यादी भावना त्यांनी सुरेख दाखवली असून त्याला साथ सुयोग गोऱ्हे यांनी दिलेली आहे, त्याच बरोबर सायली पाटील, विद्या करंजीकर यांनी त्यांच्या भूमिका ठीक केल्या आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन करताना दिग्दर्शक दत्ता भंडारे यांचा काही ठिकाणी गोंधळ झालेला जाणवतो, कथेला उत्सुकता आणताना अनेकदा कथा एकाच ठिकाणी फिरत राहते त्यामुळे सिनेमाला गती कमी मिळालेली आहे. त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे हे मात्र जाणवते. एकंदरीत चित्रपट ठीक आहे. वेगळ्या विषयावरील वेगळा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.

रेनरोज फिल्म्सने चित्रपटाची निर्मिती केली असून निर्माते मिहीर शहा हे आहेत. कथा-पटकथा आणि संवाद तसेच दिग्दर्शन दत्ता भंडारे यांचे आहे. शरद मिश्रा हे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. छायाचित्रणाची जबाबदारी विजय मिश्रा यांनी सांभाळलेली असून गुरु ठाकूर, मंदार चोळकर यांच्या गीतांना विजय गावंडे यांनी संगीत दिले आहे. या मध्ये संदीप कुलकर्णी, सुयोग गोऱ्हे, सायली पाटील, विद्या करंजीकर, फैझ यांनी प्रमुख भूमिका केल्या आहेत.

HB_POST_END_FTR-A2

.