Pimpri : यांत्रिकी पद्धतीने रस्ते साफसफाईच्या निविदेचा घोळ संपेना, आता ‘आरएफपी’च बदलली

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापलिका हद्दीतील रस्ते यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करण्याच्या 742 कोटी रुपयांच्या कंत्राटाचा घोळ काही केल्या संपेना झाला आहे. आता तर रिक्वेस्ट फॉर प्रपोजल (आरएफपी) मध्येच आयुक्तांनी परस्पर फेरबदल केल्याचे समोर आले आहे. स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेपुढे सादर केलेला प्रस्ताव आणि प्रत्यक्षातील आरएफपीमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. वाढीव वाहनसंख्या, वाढीव मनुष्यबळ यांमुळे निविदेचा खर्च वार्षिक 97 कोटींवरुन 106 कोटींवर गेला आहे. रस्ते साफसफाई कामाच्या ‘आरएफपी’तच बदल झाल्याने जुनी निविदा रद्द करुन नवीन निविदा काढल्याशिवाय आयुक्तांसमोर पर्यायच शिल्लक राहिला नाही.

महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणा-या रस्त्यांची तसेच मुंबई – पुणे महामार्गाच्या दुतर्फा रस्त्यांची यांत्रिकी    पद्धतीने दैनंदिन साफसफाई करण्यात येणार आहे. 1 हजार 670  किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची साफसफाई करण्याचे नियोजन करण्यात आले. या कामासाठी एक संयुक्त निविदा न काढता सहा विविध ‘पॅकेजेस’मध्ये विभागणी करत 8 वर्ष कालावधीसाठी निविदा काढण्याची शिफारस सल्लागाराने केली. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सल्लागाराच्या शिफारशींमध्ये फेरबदल केले. सुधारित निविदेची रक्कम 646  कोटी 53  लाख ऐवढी करत वाहनांची संख्या 51  आणि कामगारांची संख्या 706  निश्चित केली. तसेच निविदेचा कालावधी 7 वर्षे करण्यात आला. 25 सप्टेंबरपूर्वी निविदा प्रसिद्ध करण्यात आली. दोन – तीन महिने मुदतवाढ , शुद्धीपत्रक असा सोपस्कारही झाला.

नुकतीच ही निविदा उघडण्यात आली असून तांत्रिक छाननीमध्ये  6 पॅकेजसा’ठी 6 कंत्राटदारांनीच आलटून पालटून सहभाग घेतल्याचे स्पष्ट झाले. निविदेतील घोळ, बदललेल्या अटी – शर्ती, निविदेला वारंवार दिलेली मुदतवाढ यामुळे महापालिका प्रशासन आणि कंत्राटदार पैशांची लूट करत करत असल्याचे चित्र आहे. आता तर, वाढीव वाहनसंख्या, वाढीव मनुष्यबळाचे सबब देत या कामाचा खर्च वार्षिक 97 कोटींवरुन 106  कोटी रुपये झाला आहे. ‘आरएफपी’मध्येच आयुक्तांनी परस्पर फेरबदल केल्याने नव्याने निविदा काढण्याची मागणी केली जावू लागली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.