Rhea’s Interview: मी सुशांतवर प्रेम केलं हाच माझा गुन्हा- रिया चक्रवर्ती

सुशांतने मला परत कॉल केला नाही, म्हणून मी खूप दुखावले गेले होते. तो मला त्याच्या आयुष्यात परत घेऊ इच्छित नव्हता. मी आजारी असल्याकारणाने तो मला सोडत आहे का, असा विचार मी करीत होते.

एमपीसी न्यूज – बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर त्याच्याशी संबंधित अनेक गोष्टींचा दररोज वेगवेगळ्या प्रकारे खुलासा होत आहे. त्यातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिची गुरुवारी ‘आजतक’ या वृत्तवाहिनीने विस्तृत मुलाखत घेतली. आजवर रियाची अशी काही बाजू असू शकते हेच समोर आले नव्हते. पण या मुलाखतीमध्ये रियाने अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत.

यात रिया म्हणाली की, तिला सुशांतने आठ जून रोजी त्याची बहीण घरी राहायला येत असल्याने घर सोडून जाण्यास सांगितले होते. त्यानुसार ती आठ जून रोजीच घर सोडून गेली होती. त्यामुळे आठ ते तेरा जूनला सुशांतचा मृत्यू होईपर्यंतच्या कोणत्याही घटनेची ती साक्षीदार नाही. त्यावेळी सुशांतची बहीण मीतू सिंह आणि त्याचे रुममेटच तिथे राहत होते. तसेच या दरम्यान रियाची मानसिक स्थिती फारशी ठीक नव्हती.

काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि चित्रपट निर्माते महेश भट्ट यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅप चॅट मीडियात व्हायरल झाले होते. हे चॅट अभिनेता सुशांतसिंह राजपूतशी संबंधित असल्याचे म्हटले गेले होते. मात्र रियाने सादितल्यानुसार या चॅट्सचा सुशांतशी काहीही संबंध नाही.

रिया पुढे म्हणाली की, ‘सुशांतने मला परत कॉल केला नाही, म्हणून मी खूप दुखावले गेले होते. तो मला त्याच्या आयुष्यात परत घेऊ इच्छित नव्हता. मी आजारी असल्याकारणाने तो मला सोडत आहे का, असा विचार मी करीत होते. पण भट्ट सरांशी झालेल्या संभाषणाचा याच्याशी काहीही संबंध नव्हता’.

सुशांतच्या वडिलांनी रियावर त्यांच्या मुलाला विष दिल्याचा आरोप केला आहे. ‘माझा एकच गुन्हा झाला मी सुशांतवर प्रेम केले. तपासकार्यात मला जे काही विचारण्यात आले त्याची मी सगळी उत्तरे दिली आहेत. काहीच लपवले नाही’, असे रियाने म्हटले आहे.

रियावर आणखी एक आरोप सध्या करण्यात येत असून त्यानुसार रियाने 8 जून रोजी सुशांतचे घर सोडण्यापूर्वी आयटी प्रोफेशनलला कॉल करुन 8 हार्ड डिस्कमधील डेटा डिलीट केला होता. सुशांतचा रुममेट सिद्धार्थ पिठानीने सीबीआय चौकशीत हा खुलासा केला आहे.

पण खुद्द रियाने हा आरोप फेटाळून लावला आहे. ती म्हणाली, ‘या आरोपात तथ्य नाही. माझ्या माहितीनुसार तेथे हार्ड डिस्क नव्हती आणि मी तिथे असताना कोणीही तिथे आले नव्हते. कदाचित मी तिथून गेल्यावर सुशांतच्या बहिणीने कोणाला तरी फोन करुन बोलावले असावे. पण मला याबद्दल काहीही माहिती नाही. मला हेसुद्धा माहिती नाही की, सिद्धार्थ पिठानी असे काही बोलला आहे’.

रिया चक्रवर्तीवर सुशांतच्या कुटुंबीयांनी 15 कोटींची हेराफेरी केल्याचा आरोप लावला आहे. यासह सुशांतचे आयुष्यावर नियंत्रण ठेवणे, त्याचा स्टाफ बदल्याचाही आरोप तिच्यावर केला आहे. रियानेही हे दावे देखील फेटाळले आहेत.

ती म्हणते, ‘मी त्याच्या आयुष्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काहीही केले नाही. तो माझ्या आधीपासून सिद्धार्थ पिठानीला ओळखत होता. सॅम्युअल मिरांडाची (व्यवस्थापक) सुशांतची बहीण प्रियंकाने नियुक्ती केली होती. केशव (कुक), नीरज (हाऊस किपर) आणि दीपेश सावंत तिथे माझ्या आधीपासून होते. सुशांतनेच त्यांच्याशी माझ्याशी ओळख करून दिली होती’.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.